सीकर (राजस्थान): "भारताने नेहमीच सर्वांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले असून आता तो जागतिक पटलावर आपले योग्य स्थान प्रस्थापित करत आहे," असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
ते सीकर येथील रेवासा धामातील श्री जानकीनाथ बड़ा मंदिरात स्वामी राघवाचार्य वेदांती महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. स्वामी राघवाचार्य हे रेवासा पीठाचे माजी पीठाधीश्वर होते.
भागवत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही टिकेल का याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, ती फक्त टिकलीच नाही तर संकटाच्या काळात जनतेने तिचे रक्षण केले. "आज भारत अनेक देशांपेक्षा लोकशाही पद्धतींच्या आघाडीवर आहे," असे ते पुढे बोलताना म्हणाले.
भारताच्या सांस्कृतिक प्रवासाचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, देशाने समृद्धी व दारिद्रय, स्वातंत्र्य व परकीय सत्ता या सर्व टप्प्यांतून प्रवास केला तरी ध्येय अबाधित राहिले. "जगाला जेव्हा गरज भासली, तेव्हा भारत उभा राहिला," असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी त्यांनी स्वामी राघवाचार्याची मूर्ती अनावरण केली आणि नव्या गुरुकुल भवनाचे उद्घाटन केले. भागवत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा समाजासाठीचा जिव्हाळा व समर्पण अधोरेखित केले.