India to begin International flights to select countries via Air Bubbles says civil aviation minister | मोठी बातमी! आता एअर बबल्सच्या माध्यमातून सुरू होणार आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक

मोठी बातमी! आता एअर बबल्सच्या माध्यमातून सुरू होणार आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू करण्यासाठी भारताची किमान तीन देशांसोबत चर्चा सुरू असल्याचं पुरी यांनी सांगितलं. कोरोना संकटामुळे परिस्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागेल. तोपर्यंत एअर बबल्स हाच हवाई वाहतुकीसाठी पर्याय असेल, असं पुरी म्हणाले.

कोरोना संकटामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता एअर बबल्सच्या माध्यमातून ठराविक देशांसोबतच हवाई वाहतूक करता येईल. यासाठी फ्रान्स, अमेरिका आणि जर्मनीसोबत चर्चा सुरू असून ती जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती हरदीप सिंग सुरी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. ग्राहकांना आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करताना ठराविक मार्गांचाच वापर करता येईल. यासोबतच प्रवासी देशातून बाहेर पडण्यापूर्वी आणि देशात येताना त्यांचं चेकिंग केलं जाईल, असं पुरी यांनी सांगितलं.

जगभरातल्या इतर देशांनीसुद्धा हवाई मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीकडे व्हिसा असूनही त्याला संबंधित देशात जाण्याची परवानगी मिळणार नाही. त्यासाठी त्याला अतिरिक्त कागदपत्रं सादर करावी लागतील आणि अधिकच्या परवानग्यांची आवश्यकता भासेल, अशी माहिती पुरी यांनी दिली.

एअर बबल्स म्हणजे काय?
एअर बबल्सला कोरोना कॉरिडोर्स, ग्रीन कॉरिडोर्स किंवा ट्रॅव्हल कॉरिडोर्सदेखील म्हटलं जातं. हवाई वाहतूक सुरू करण्यासाठी हा दोन देशांनी केलेला करार असतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आलं असल्यास दोन देश हवाई वाहतुकीस परवानगी देऊ शकतात. अशा प्रकारची वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीनं भारतानं जूनपासून प्रयत्न सुरू केले आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India to begin International flights to select countries via Air Bubbles says civil aviation minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.