इराणविरोधात अमेरिका आणि इस्राइलने सुरू केलेल्या कारवाईदरम्यान एका इराणीयुद्धनौकेला अमेरिकन नौदलाने हिंदी महासागरात बुडवले. या घटनेवरून जगभरात खळबळ उडाली होती. तसेच भारतातही यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. इराणने तीन युद्धनौकांसाठी आश्रय मागितला असताना केवळ एकाच युद्धनौकेला का परवानगी दिली असा प्रश्न विचारला जात होता. मात्र आता याबाबतची नेमकी माहिती समोर आली आहे.
याबाबत संसदेमध्ये उत्तर देताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणने २८ फेब्रुवारी रोजी आपल्या तीन युद्धनौकांसाठी आश्रय मागितला होता, असे सांगितले. याआधी रायसिना डायलॉगमध्येही परराष्ट्रमंत्र्यांनी एक इराणी युद्धनौका भारतात येऊ इच्छित होती. मात्र तिच्याबाबत गोंधळ उडाला होता. असे सांगितले. आता याबाबत संसदेमध्ये परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागण्यात आलं होतं. तसेच तीन युद्धनौकांना परवानगी देण्यात आली होती. तर मग उर्वरित दोन युद्धनौका भारतात आश्रयाला का आल्या नाहीत? त्यामागे काही दबाव होता की अन्य कारण अशी विचारणा करण्यात आली होती.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणच्या विनंतीनुसार भारत सरकारने इराणी नौदलाच्या आयआरआयएस लवन, बुशर आणि देना या तीन युद्धनौकांना भारतीय बंदरांमध्ये थांबण्याची परवानगी दिली होती. भारताने आपल्याकडून या तिन्ही युद्धनौकांना हिरवा कंदिल दाखवला होता. मात्र प्रत्यक्षात कोची येथे केवळ आयआरआयएस लवन ही एकच युद्धनौका पोहोचली.
उर्वरित युद्धनौका भारतात न येण्यामागचं कारण आता समोर आलं आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार भारताने प्रक्रिया पूर्ण केली असतानाच शेजारील श्रीलंकेनेही सक्रियदा दर्शवली आणि इराणी युद्धनौकांना आपल्या बंदरात येण्याची परवानगी दिली. त्यामुळे रणनीतिक आणि तांत्रिक कारणांमुळे तीन पैकी दोन युद्धनौकांनी श्रीलंकेचं निमंत्रण स्वीकारले. तसेच श्रीलंकेच्या दिशेने कूच केलं. म्हणजेच या युद्धनौकांना भारतात येण्यापासून कुणीही अटकाव केला नव्हता. तर इराणने स्वत:च निर्णय घेतला होता. तसेच या युद्धनौकांनी आपला मार्ग बदलला होता.