भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 08:56 IST2025-07-09T08:55:05+5:302025-07-09T08:56:04+5:30
Bihar Chakka Jam news: इंडिया अलायन्सने आज बिहारमध्ये चक्काजामची घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण विरोधी पक्ष राज्यभर निदर्शने करत आहेत.

भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
देशभरातील विविध कामगार संघटनांनी प्रस्तावित कायद्यांविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी आज भारत बंदची हाक दिली आहे. असे असताना बिहारमध्ये इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात सकाळपासूनच रस्त्यांवर टायर जाळत, रेल्वे गाड्या रोखत चक्का जाम केले आहे. यामुळे बिहारमध्ये भारत बंद राहिला बाजुलाच इंडिया आघाडीनेच रस्ते आणि रेल्वेसह विविध ठिकाणे काबीज केली आहेत.
इंडिया अलायन्सने आज बिहारमध्ये चक्काजामची घोषणा केली आहे. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण विरोधी पक्ष राज्यभर निदर्शने करत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी पाटण्याला रवाना होत आहेत. पाटणा तेजस्वी यादव यांच्यासोबत आयकर चौकापासून निवडणूक कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, डावे पक्ष, विकासशील इन्सान पक्षाचे कार्यकर्ते सकाळी सहा वाजल्यापासूनच रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात येत आहे.
दरभंगा, जहानाबादसह अनेक ठिकाणी रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. दरभंगात नमो भारत ट्रेनवर चढून आंदोलन केले जात आहे. तसेच राजधानी पाटणा, मुझफ्फरपूर, पूर्णिया, भागलपूर, गयासह अनेक भागात रस्ते रोखण्यात आले आहेत. रस्त्यांवर टायर जाळण्यात येत आहेत. रस्ता जाममुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बिहारमधील तीन कोटींहून अधिक लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी महाआघाडीने पुकारलेल्या बिहार बंदवर म्हटले आहे की, 'हे दुःखद आणि दुर्दैवी आहे. जर निवडणूक आयोगाला जागरूकता पसरवायची असेल तर त्यात काय चूक आहे? हे कोणत्याही जातीसाठी किंवा पक्षासाठी नाही तर सर्वांसाठी आहे. बाहेरील लोक मतदान करू शकत नाहीत यावर त्यांना आक्षेप का आहे?'.