INDIA Alliance : हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा EVM वर खापर फोडायला सुरुवात केली आहे. अनेक नेत्यांनी तर पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. मात्र, याच मुद्द्यावरुन INDIA आघाडीत दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीदेखील काँग्रेसचे EVM वरील आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. सोमवारी संसद भवन संकुलात प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, 'ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांकडे याचे पुरावे असतील, तर त्यांनी ते निवडणूक आयोगाकडे सादर करावे. अशा आरोपांमध्ये काही तथ्य नाही, असे मला वाटते. अजूनही कोणाला वाटत असेल की, ईव्हीएम हॅक होऊ शकते, तर त्यांनी निवडणूक आयोगाला सिद्ध करुन दाखवावे अन्यथा असे निरर्थक विधाने करुन काहीही होणार नाही,' असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीदेखील ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ओमर म्हणतात, 'जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा तुम्ही निवडणूक निकाल स्वीकारता आणि जेव्हा तुम्ही हरता, तेव्हा तुम्ही ईव्हीएमला दोष देता. तुमचे 100 पेक्षा जास्त खासदार याच EVM मुळे निवडून आले, तेव्हा तुम्ही पक्षाचा विजय म्हणून साजरा केला. आता निवडणुकीचे निकाल तुमच्या मनासारखे लागले नाही, म्हणून तुम्ही EVM ला दोष देऊ शकत नाही,' अशी बोचरी टीका त्यांनी केली.