Independence Day: 15 ऑगस्ट 1947 हीच तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी का निवडली गेली?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 10:44 AM2022-08-15T10:44:38+5:302022-08-15T10:49:09+5:30

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच म्हणजे 15 ऑगस्ट दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली. 

Independence Day 2022 : Why 15 August 1947 date was fixed for freeing India from british rule | Independence Day: 15 ऑगस्ट 1947 हीच तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी का निवडली गेली?

Independence Day: 15 ऑगस्ट 1947 हीच तारीख भारताच्या स्वातंत्र्यासाठी का निवडली गेली?

googlenewsNext

Independence Day History : भारत आपला ७5वा म्हणजेच अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. देशभरात जल्लोष बघायला मिळत आहे. अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. पण देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी याच दिवसाची निवड का केली गेली? असा प्रश्न अनेकांना पडत असावा. भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हा निर्णय घेतला होता. चला जाणून घेऊ स्वातंत्र्यासाठी या दिवसाची निवड का झाली. 

माऊंटबॅटन यांना दिला होता अधिकार

जेव्हा इंग्रजानी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेही ठरवले की, लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाइसरॉय असतील. ब्रिटीश संसदेने त्यांना ३० जून १९४८ पर्यंत भारताची सत्ता भारतातील लोकांना हस्तांतरित करण्याचा वेळ दिला होता. खरंतर या दिवशीच स्वातंत्र्य का दिले गेले याबाबत अनेक मतमतांतरे बघायला मिळतात. 

एकीकडे महात्मा गांधी भारत छोडो आंदोलन होतं आणि दुसरीकडे फाळणीवरुन गांधी आणि जिना यांच्यात वाद होते. या दोन कारणांमुळे माऊंटबॅटन यांच्यावरील सत्ता हस्तांतरणाचा दबाव वाढू लागला होता. त्यामुळे त्यांनी आणखी एक वर्ष वाट पाहण्याऐवजी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य बहाल केलं. १५ ऑगस्ट ही तारीख निवडण्यामागे हेही एक कारण मानलं जातं. 

वेगळीच तारीख ठरली होती

माऊंटबॅटन हे भारतात आल्यानंतर स्वातंत्र्याबाबत अनेक बदल केले गेले. त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची तारीख ३ जून १९४८ ठरवली होती. पण ही तारीख बदलून त्यांनी १५ ऑगस्ट १९४७ केली. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय मानला जातो. 

यासाठीही १५ ऑगस्ट दिवस खास

लॉर्ड माऊंटबॅटन हे १५ ऑगस्टला यासाठीही महत्वाचा दिवस मानत होते, कारण याच दिवशी १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जपानने ब्रिटीश सेनेसमोर शरणागती पत्करली होती. माऊंटबॅटन यांना ही तारीख यासाठी अधिक लक्षात होती कारण ते त्यावेळी अलायस फोर्सेसचे कमांडर होते. 

लॅरी कॉलिंग आणि डोमिनिक लॅपिअर यांच्या 'फ्रिडम अॅट मिड नाइट' या पुस्तकात माऊंटबॅटन यांनी ही तारीख का निवडली याचं कारण सांगितलं आहे. व्हाइसरॉय यांच्यानुसार, 'एका प्रश्नाचं उत्तर देताना मी १५ ऑगस्ट हा दिवस निवडला. मला लोकांना हे दाखवायचे होते की, सगळंकाही माझ्या नियंत्रणात आहे. मला विचारण्यात आले होते की, कोणती तारीख निश्चित केली आहे. त्यावेळी माझ्या डोक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना आला होता. त्यानंतर मी १५ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. याच तारखेला द्वितीय महायुद्धात जपानने ब्रिटीश सेनेसमोर समर्पण केलं होतं'.

भारत-पाकिस्तान फाळणी

स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच देशाचे दोन तुकडे करण्यात आले. फाळणीसोबतच भारतातील ५०० पेक्षा जास्त संस्थांनांचंही विभाजन केलं जाणार होतं. ब्रिटीश सरकारने या संस्थानांच्या राजांना संदेश दिला होता की, ते त्यांच्या विचारांनुसार भारत किंवा पाकिस्तानात जाणे ठरवू शकतात. 

इंग्रजांना होती जिनांच्या मृत्यूची भीती

काही इतिहासकारांचं असं मत आहे की, इंग्रजांनी जिना यांच्या आधारे भारताची फाळणी करण्याचा कट रचला होता. जेणेकरुन दोन्ही देश हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरुन भांडत राहतील. त्यावेळी इंग्रजांना जिना यांच्या आजाराबाबत माहिती मिळाली होती. त्यांना भीती होती की, जर जिना यांचा मृत्यू स्वातंत्र्याच्या घोषणेच्याआधी झाला तर महात्मा गांधी मुस्लिमांना विभाजनाचा रस्ता न निवडण्यासाठी तयार करतील. त्याच कारणाने इंग्रजांनी ३ जून १९४८ ऐवजी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य बहाल केले. नंतर तेच झालं ज्याची इंग्रजांना भीती होती. स्वातंत्र्याच्या काही महिन्यातच टीबी या आजारामुळे मोहम्मद अली जिना यांचा मृत्यू झाला. 

Web Title: Independence Day 2022 : Why 15 August 1947 date was fixed for freeing India from british rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.