India vs Pakistan, Operation Sindoor : भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी 'Operation Sindoor: Before and Beyond’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात भारतीय लष्कराच्या भूमिकेचे कौतुक केले आणि सांगितले की ऑपरेशन सिंदूर दरम्यान सैन्याने उत्कृष्ट कामगिरी केली. १० मे रोजी पाकिस्तानविरोधात आपण युद्धविराम घेतला असला तरीही हे युद्ध तिथेच संपलेले नाही, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे, असा पुनरूच्चार द्विवेदी यांनी केला.
काय म्हणाले जनरल द्विवेदी?
"तुम्हाला वाटत असेल की युद्ध १० मे रोजी संपले. तर ते तसं नाहीये! ते पुढेही बराच काळ चालू राहिले. कारण बरेच निर्णय अजून घेतले गेले नव्हते. प्रत्येक आक्रमण आणि बचाव या कृतींचा दीर्घकालीन परिणाम होता याची साऱ्यांनाच कल्पना होती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, कधी सुरू करायचे, कधी थांबवायचे, किती सैन्य आणि हत्यारबंदी तैनात करायची हे ठरवणे हा एक मोठा प्रश्न होता. अशा वेळी माजी सैनिकांकडून सल्ला घेण्यात आला आणि अनेक पर्यायांवर चर्चा करण्यात आली. प्रत्येक निर्णय हा भविष्यावर परिणाम करणार होता. त्यामुळे आम्ही विचारपूर्वक निर्णय घेत होतो.
८८ तास सुरू होतं 'ऑपरेशन सिंदूर'
"संपूर्ण कारवाई ही एखाद्या लाटेसारखी एकसलग सुरू होती. तब्बल ८८ तासांपर्यंत कोणालाही स्वतंत्र नियोजन किंवा आदेशांची वाट पहावी लागली नाही. प्रत्येकजण एकमेकांशी समन्वय आणि समतोल साधून आपापली कामगिरी पार पाडत होता. प्रत्येकाला त्याचे-त्याचे काम माहिती होते. ऑपरेशन सिंदूर ही एक प्रकारची "अनटोल्ड स्टोरी" होती. पाकिस्तानने नंतर किती जणांना मरणोत्तर पुरस्कार दिले, ते पाहून तुम्हा-आम्हाला अंदाज आला असेलच की, याचे बहुतेक श्रेय नियंत्रण रेषेवरील जवानांना जाते. कारण अलिकडेच अहवाल आला होता ज्यात पाकिस्तानी सैनिकांच्या एका गटाला मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार होते," असे जनरल द्विवेदी म्हणाले.
लष्करप्रमुख द्विवेदी म्हणाले, "हे पुस्तक पूर्णपणे तथ्यांवर आधारित आहे आणि त्यात सुपर-स्ट्रॅटेजिकपासून ते टॅक्टिकल लेव्हलपर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. इतक्या लहान पुस्तकात या सर्व पैलूंचा समावेश करणे खूप कठीण काम आहे, परंतु लेखकाने ते खूप चांगल्या प्रकारे एकत्र केले आहे."