Increased difficulty of Maharashtra Governar Bhagat Singh Koshyari, now contempt notice sent by High Court | महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आता हायकोर्टाचा दणका; पाठवली अवमानना नोटिस

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आता हायकोर्टाचा दणका; पाठवली अवमानना नोटिस

ठळक मुद्देउत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांनी सरकारी निवासस्थान तसेच अन्य सुविधांच्या मोबदल्यात थकीत रक्कम ६ महिन्यांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले होतेमात्र कोश्यारी यांनी कोर्टाच्या आदेशानुसार थकीत भाडे जमा केले नाही. त्यामुळे मंगळवारी कोर्टाने त्यांच्याविरोधात नोटिस जारी केलेभगत सिंह कोश्यारी यांच्याकडे घरभाडे आणि अन्य सुविधांसाठीची ४७ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. याशिवाय वीज आणि पाण्याचे बिलही त्यांनी भरलेले नाही

मुंबई - राज्यातील मंदिरे उडण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासमोर आता अजून एक अडचण निर्माण झाली आहे. घरभाडे आणि इतर सुविधांसाठीचे सुमारे ४७ लाख रुपयांचे भाडे थकवल्याने उत्तराखंड हायकोर्टाने महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांच्याविरोधात अवमानना नोटिस बजावली आहे. तसेच या नोटिशीला चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्याची सूचना कोर्टाने कोश्यारी यांना केली आहे. न्यायमूर्ती शरदकुमार सिन्हा यांच्या खंडपीठाने एका एनजीओच्या याचिकेवर सुनावणी करताना ही नोटिस बजावली आहे.

या प्रकरणी रुरल लिटिगेशन अँड इंटारइटेल्मेंट केंद्र (रुलक) ने उत्तराखंड हायकोर्टात कोश्यारींच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उत्तराखंड हायकोर्टाने गतवर्षी माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांनी सरकारी निवासस्थान तसेच अन्य सुविधांच्या मोबदल्यात थकीत रक्कम ६ महिन्यांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र कोश्यारी यांनी कोर्टाच्या आदेशानुसार थकीत भाडे जमा केले नाही. त्यामुळे मंगळवारी कोर्टाने त्यांच्याविरोधात नोटिस जारी केले.

रुलकनेच कोश्यारी यांनी थकीत रक्कम जमा न केल्याने अवमानना याचिका दाखल केली होती. यावर कोर्टाने राज्य सरकारला विचारले की, आदेशाचे पालन का करण्यात आले नाही. तसेच माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारींविरोधात खटला दाखल का करण्यात येऊ नये.

राज्यपाल आणि राष्ट्रपतींविरोधात अवमानना याचिका दाखल करण्यापूर्वी दोन महिने आधी त्यांना तशी सूचना देणे आवश्यक असते. याचिकाकर्त्याने सांगितले की, ही बाब लक्षात घेऊन कोश्यारी यांना ६० दिवसांपूर्वी नोटिस पाठवण्यात आली होती. १० ऑक्टोबर रोजी दोन महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली. भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे घरभाडे आणि अन्य सुविधांसाठीची ४७ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. याशिवाय वीज आणि पाण्याचे बिलही त्यांनी भरलेले नाही.

दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कोरोनामुळे बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचे आवाहन केले होते. या पत्रातून कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे राज्यपालांच्या या पत्रावर टीकेची झो़ड उठली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कोश्यारी यांच्याविरोधात तक्रार केली होती. कुणी आत्मसन्मान असलेली व्यक्ती असली असती तर तिने राजीनामा दिली असता, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Increased difficulty of Maharashtra Governar Bhagat Singh Koshyari, now contempt notice sent by High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.