बापरे! 8 हजार कमावणाऱ्या व्यक्तीला 12 कोटींची Income Tax नोटीस; तरुण हादरला, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 13:09 IST2023-04-04T13:03:32+5:302023-04-04T13:09:12+5:30
तरुणाला आयकर विभागाने 12 कोटी 23 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे. यामुळे तरुणाला मोठा धक्का बसला आहे.

फोटो - आजतक
राजस्थानमधील भिलवाडा शहरात स्टेशनरीचं एक छोटंसं दुकान चालवणाऱ्या एका दिव्यांग तरुणाला आयकर विभागाने 12 कोटी 23 लाख रुपयांहून अधिक रकमेच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे. यामुळे तरुणाला मोठा धक्का बसला आहे. त्याने नोटीस वाचली तेव्हा सुरतमध्ये त्याच्या नावावर दोन कंपन्या सुरू असल्याचे कळले. यानंतर तो पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेला.
दिव्यांग कृष्ण गोपाल छापरवाल याच्या म्हणण्यानुसार त्याचे सांगानेर येथे स्टेशनरीचे छोटे दुकान आहे. तो फोटोग्राफर असून या माध्यमातून तो महिन्याला 8 ते 10 हजार रुपये कमावतो. मात्र त्याला 12 कोटी 23 लाख 90 हजार 86 रुपयांची आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आल्याने धक्का बसला आहे. त्यानंतर त्याने सुभाष नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दोन कंपन्यांचा उल्लेख
तरुणाने पॅनकार्ड आणि आधार कार्डचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असं म्हटलं आहे. त्याला मिळालेल्या नोटीसमध्ये दोन कंपन्यांचा उल्लेख करण्यात आला असून, त्यांच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. एवढेच नाही तर तो कधी सुरतलाही गेला नाही असं म्हटलं आहे.
"महिन्याला 8 ते 10 हजार रुपये उत्पन्न"
तरुणाने सांगितले की, "माझा भिलवाडा येथेच एक छोटासा व्यवसाय आहे. मी एक फोटोग्राफर आहे आणि मी वेडिंग फोटोग्राफीचे काम करतो. माझे महिन्याला 8 ते 10 हजार रुपये उत्पन्न आहे". याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"