‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; पोलिसांचा वाढीव फौजफाटा सात रुग्णवाहिकांसह विद्यापीठात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 07:01 IST2020-01-06T07:00:32+5:302020-01-06T07:01:04+5:30
प्रतिष्ठेच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी; पोलिसांचा वाढीव फौजफाटा सात रुग्णवाहिकांसह विद्यापीठात दाखल
नवी दिल्ली : येथील प्रतिष्ठेच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दगडफेक आणि हिंसाचारात १८ जण जखमी झाले. जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड झाली.
जेएनयू स्टुडन्ट््स युनियन आणि संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांनी या हिंसाचाराचे खापर परस्परांवर फोडले व त्यात आपले अनेक सदस्य जखमी झाल्याचा दावा केला. विद्यापीठ प्रशासनाने कॅम्पसमधील परिस्थिती गंभीर असल्याचे नमूद करत तातडीने पोलिसांना पाचारण केले. रात्री पोलिसांचा वाढीव फौजफाटा सात रुग्णवाहिकांसह विद्यापीठात दाखल झाला होता.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी चित्रित केलेले दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यापैकी एका व्हिडीओत स्टुडन्ट्स युनियनच्या अध्यक्षा आयशी घोष डोक्याला खोक पडल्याने रक्तबंबाळ झाल्याचे दिसत होते. घोष कम्युनिस्ट पक्षाच्या स्टुडन्ट्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएफआय) पदाधिकारी आहेत. दुसरा व्हिडीओ ‘अभाविप’वाल्यांचा होता व त्यात त्यांनी त्यांचे अनेक सदस्य विद्यार्थी जखमी झालेले दाखविले होते.
विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेने आयोजित केलेला एक कार्यक्रम सुरु असताना हा हिंसाचार झाला. ‘अभाविप’वाल्यांनी चेहऱ्यावर बुरखे घालून आणि हातात दगड, विटा, लाठ्या, लोखंडी सळ््या घेऊन अचानक हल्ला सुरु केला. पोलीस त्यांना आवरण्याऐवजी साथ देत होते. हल्लेखोरांनी सैरावैरा धावणाºया विद्यार्थ्यांना पाठलाग करून आणि हॉस्टेलमधून बाहेर खेचून बेदम चोपले. या हिंसाचारात आयशू घोष यांचे डोके फुटले व इतरही अनेक विद्यार्थी रक्तबंबाळ झाले, असा आरोप स्टुडन्ट्स युनियनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला. अभाविपवाल्यांच्या या हैदोसास संघिष्ट अध्यापकांनीही फूस लावली व दोघे मिळून विद्यार्थ्यांना ‘भौरत माता की जय’च्या घोषणा देण्याची जबरदस्ती करत होते, असेही या पत्रकात नमूद केले गेले.
याचा इन्कार करत अभाविपने स्टुडन्ट््स युनियनवरच हल्ला केल्याचा आरोप केला. संघवाल्यांच्या या संघटनेने म्हटले की, दुसºया सेमिस्टरसाठी रजिस्ट्रेशन करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. पण डाव्या संघटनावाल्यांनी गेले तीन दिवस इंटरनेट बंद करून ठेवल्याने अनेकांना रजिस्ट्रेशन करता आले नाही.याचा जाब विचारायला गेल्यावर त्यांनी उलट आमच्यावरच हल्ला केला. या हिंसाचारात आमच्या जेएनयू युनिटचे अध्यक्ष दुर्गैश कुमार यांच्यासह अनेक जण गंभीर जखमी झाले. अनेकांना ‘एम्स’ व शपदरजंग इस्पितळांत हलविण्यात आले.
>बुरखाधारी हल्लेखोर जेएनयूमध्ये घुसले आणि पोलीस बघत बसले. रा. स्व. संघ आणि भाजपाला भारताचे काय करायचे आहे हे सोबतच्या व्हिडिओवरून स्पष्ट होते. पण आम्ही त्यांना यात यशस्वी होऊ देणार नाही.
- सिताराम येचुरी, मार्क्सवादी नेते
>आमचे जीव धोक्यात आहेत! सुमारे एक हजार ‘नक्षलीं’नी आज ‘जेएनयू’मध्ये हैदोस घातला. प्रशासकीय भवन आणि साबरमती व पेरियार हॉस्टेलमधून बाहेर काढून आमच्या ५० हून अधिक सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
- दुर्गेश कुमार,
अध्यक्ष, अभाविप जेएनयू
‘जेएनयू’मधील हिंसाचाराने मला
जबर धक्का बसला. विद्यापीठांतच विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर या देशाचे भले कसे होणार? पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करावी.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली