अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 14:09 IST2025-12-15T14:08:39+5:302025-12-15T14:09:08+5:30
जिल्ह्यातील लोकेश्वर मंडल स्थित ग्राम पंचायत बागापूर येथील ही घटना आहे. मुत्याला श्रीवेधा या गावच्या नवीन सरपंच बनल्या आहेत.

अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
निर्मल - तेलंगणा येथील निर्मल जिल्ह्यात एक रंजक घटना घडली आहे. याठिकाणी गावच्या सरपंचपदाची निवडणूक लढवणारी महिला उमेदवार अवघ्या एका मताने विजयी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रत्येक मत का महत्त्वाचे असते हे पुन्हा अधोरेखित झाले.
जिल्ह्यातील लोकेश्वर मंडल स्थित ग्राम पंचायत बागापूर येथील ही घटना आहे. मुत्याला श्रीवेधा या गावच्या नवीन सरपंच बनल्या आहेत. या ग्रामपंचायतीचा निकाल तेव्हा चर्चेत आला जेव्हा याठिकाणी त्यांचे सासरे मृत्याला इंद्रकरण रेड्डी खासकरून सूनेला मतदान करण्यासाठी अमेरिकेहून त्यांच्या मूळ गावी आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४२६ नोंदणीकृत मतदारांपैकी ३७८ जणांनी मतदान केले. श्रीवेधा यांना १८९ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या हर्षस्वाथी यांना १८८ मते मिळाली. मतदानातील एक मत बाद करण्यात आले होते. या निकालाने प्रत्येक मत किती महत्त्वाचे असते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
तेलंगणात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने बाजी मारली आहे. याठिकाणी एकूण ४२३० जागांपैकी काँग्रेसने २४२५ जागा जिंकल्या आहेत. पक्षाला ५७.३२ टक्के मते पडली आहे. तेलंगणा राज्य निवडणूक आयोगाने ४२३० ग्राम पंचायतीचे निकाल जाहीर केले. त्यात विरोधी पक्षातील भारत राष्ट्र समितीने ११६८ जागांवर विजय मिळवला. भाजपाने १८९ जागा, सीपीएमने २४ जागा, सीपीआयने २३ जागा तर अपक्ष उमेदवारांनी ४०१ जागा जिंकल्या आहेत.