९० मिनिटांत 'त्याने' ५० जणांचा घेतला चावा; लोकांमध्ये पसरली दहशत, संतप्त जमावाने ठार केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:09 IST2025-07-28T11:08:27+5:302025-07-28T11:09:06+5:30
कुणाच्या गळ्याला, कुणाच्या पायाला तर कुणाच्या हाताला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. या जखमींना तात्काळ प्राथमिक उपचार करून एँटी रॅबीज इंजेक्शन देण्यात आले.

९० मिनिटांत 'त्याने' ५० जणांचा घेतला चावा; लोकांमध्ये पसरली दहशत, संतप्त जमावाने ठार केले
बिहारच्या सासाराम जिल्ह्यातील जमालपूर आणि हरिहरगंज इथं एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या दहशतीने स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरले होते. रविवारी सकाळी या कुत्र्याने दीड तासात ५० लोकांचा चावा घेतला. त्याशिवाय अनेक गुरेढोरेही पिसाळलेल्या श्वानाला बळी पडले. कुत्र्याच्या या दहशतीने सगळीकडे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर संतापलेल्या गावकाऱ्यांनी या कुत्र्याला घेरून मारून टाकल्याचा प्रकार घडला आहे.
माहितीनुसार, रविवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पाहता पाहता या भटक्या कुत्र्याने ५० जणांचा चावा घेतला. कुत्र्याच्या दहशतीने लोक सैरावैरा पळू लागले. काही वेळातच परिसरात मोठा गोंधळ उडाला. कुत्र्याच्या या दहशतीने परिसरातील संतप्त जमावाने कुत्र्याला घेराव करत ठार केले. पहाटे ५ च्या सुमारास हा प्रकार घडला. लोक मॉर्निंग वॉक करण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यावेळी कुत्र्याने गावकऱ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर जो कुणी दिसत होता त्याच्यावर हा श्वान हल्ला करत होता.
कुणाच्या गळ्याला, कुणाच्या पायाला तर कुणाच्या हाताला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. या जखमींना तात्काळ प्राथमिक उपचार करून एँटी रॅबीज इंजेक्शन देण्यात आले. दुपारपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी लोकांची गर्दी झाली होती. अतिमीगंज, जमालपूर, हरिहरगंज आणि नासरीगंज इथल्या अनेक गावकऱ्यांना रॅबीज इंजेक्शन देण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधीही घटनास्थळी पोहचले. सध्याचे संकट पाहता प्रशासनाने परिसरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यात या कुत्र्यांना पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले जाणार आहे.
कुत्रं चावल्यावर तातडीने करा 'हे' काम
भारतात दरवर्षी १८ ते २० हजार लोकांचा जीव कुत्रं चावल्यामुळे जातो. कारण बरेच लोक कुत्रा चावल्यावर लगेच त्यावर योग्य ते उपचार न घेता थोडीच जखम झाल्याचं सांगत त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र कुत्रा चावल्यानंतर काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या जागेवर कुत्र्यानं चावलं आहे, ती जागा लवकर साफ करा. पाणी लावायला अजिबात घाबरू नका. ही जखम १० ते १५ मिनिटं अॅंटी-सेप्टिक सोप व पाण्यानं साफ करा. जखम साफ केल्यावर त्यावर अॅंटीसेप्टिक लावा. हे केल्यावर रक्तस्त्राव कमी व्हायला हवा. जर असं झालं नाही तर पट्टी बांधून रक्तस्त्राव रोखा. त्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जा.