आक्षेपानंतर छापा प्रकरण लगेच म्यान
By Admin | Updated: May 12, 2014 01:45 IST2014-05-11T21:43:49+5:302014-05-12T01:45:32+5:30
उत्तर प्रदेश पोलीस व निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी वाराणसीतील भाजपा कार्यालयात छापा मारून मोठ्या प्रमाणात प्रचारसाहित्य जप्त केले़ पण भाजपाने तीव्र आक्षेप नोंदवताच काही तासातच आयोगाने हे प्रकरण म्यान केले.
आक्षेपानंतर छापा प्रकरण लगेच म्यान
आयोगाशी संघर्ष सुरुच
वाराणशी : मतदानाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेश पोलीस व निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनी येथील भाजपा कार्यालयात छापा मारून मोठ्या प्रमाणात प्रचारसाहित्य जप्त केले़ पण भाजपाने तीव्र आक्षेप नोंदवताच काही तासातच आयोगाने हे प्रकरण म्यान केले. नरेंद्र मोदी यांना सभेची परवानगी नाकारल्यावरुन भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात पेटलेला संघर्ष अडूनही धुमसत असल्याचा अनुभव मतदानाला अवघे काही तास उरलेले असताना वाराणशीकरांनी घेतला.
रविवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने सिगरा येथील भाजपा कार्यालयात छापा मारला़ प्रचार थांबला असताना या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात प्रचारसामग्री वितरित होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे एका अधिकार्याने सांगितले़ या पथकाने कार्यालयातून चार पोती टी-शर्ट, पाच हजार प्रचारपत्रे, नरेंद्र मोदींचे चित्र असलेले दोन हजार बिल्ले असे अनेक साहित्य जप्त केले़ हे साहित्य भाजपा कार्यालयातून अन्यत्र हलविले जात असल्याचे आढळल्याचे हा अधिकारी म्हणाला़ दरम्यान वाराणशीचे जिल्हाधिकारी प्रांजल यादव आणि विशेष निवडणूक निरीक्षक प्रवीण कुमार यांनी हे साहित्य प्रचारासाठी वापरले जाणार नसल्याचे बघून हे प्रकरण बंद केले असल्याचे जाहीर केले. (वृत्तसंस्था)
----------------
भाजपाची नारेबाजी
पक्ष कार्यालयावरील या कारवाईिवरुद्ध भाजपाने आक्रमक पवित्रा घेत, मलदहिया-सिगरा मार्गावर जोरदार नारेबाजी केली़ यामुळे संपूर्ण मार्ग जाम झाला़ छाप्यात जप्त केलेली सामग्री न वापरलेली प्रचारसामग्री होती़ हे साहित्य कुठेही वितरित करण्यात येणार नव्हते़ हे साहित्य संबंधित निर्मात्यांना परत करण्यासाठी कार्यालयातून नेले जात होते, असा दावा भाजपा नेत्यांनी केला.