उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवा अन् बदली रद्द करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 14:23 IST2025-03-25T14:21:56+5:302025-03-25T14:23:28+5:30

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वकिलांचा संपावर जाण्याचा इशारा

Impeach High Court Judge Yashwant Verma and cancel his transfer | उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवा अन् बदली रद्द करा!

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवा अन् बदली रद्द करा!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी सापडलेल्या १५ कोटींच्या रोकडप्रकरणी त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी आक्रमक मागणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने केली आहे. सरकारने यासाठी शिफारस करावी, असेही बार असोसिएशनने म्हटले आहे. दरम्यान, न्या. वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याच्या निर्णयाविरुद्ध संप पुकारण्याचा इशारा वकिलांनी दिला आहे.

बार असोसिएशन अध्यक्ष अनिल तिवारी यांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करून त्याची सीबीआय आणि ईडीसह इतर संस्थांमार्फत चौकशी करण्याची तत्काळ परवानगी द्यावी, असे नमूद केले. गरज पडल्यास वर्मा यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची परवानगी द्या, अशी आक्रमक मागणीही त्यांनी केली.

कॉलेजियमकडून बदलीला पुष्टी

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने सोमवारी वादग्रस्त न्यायाधीश वर्मा याची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यासंबंधीच्या निर्णयाची पुष्टी केली.

सर्व नेते एकत्र: राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी रोख रकमेच्या प्रकरणात सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा केली. याप्रकरणी भाजपचे नेते जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी झालेल्या बैठकीत धनखड यांनी समितीचा अहवाल येईपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले.

निकालास आव्हान

  • गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या या याचिकेद्वारे १९९१च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयास आव्हान देण्यात आले आहे.
  • या निकालात सरन्यायाधीशांच्या पूर्वपरवानगीशिवाय उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशांविरुद्ध कारवाई सुरू करता येणार नाही, असे नमूद आहे.


विरोधी पक्षही आक्रमक

या प्रकरणात बहुतांश विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी केली आहे. न्या. वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवला जावा, असा सल्लाही नेत्यांनी दिला आहे.

गुन्हा दाखल करा

न्या. वर्मा यांच्या निवासस्थानी  नोटा सापडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Impeach High Court Judge Yashwant Verma and cancel his transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.