मी शेतकरी विरोधी नाही -पंतप्रधान
By Admin | Updated: March 5, 2015 23:47 IST2015-03-05T23:47:33+5:302015-03-05T23:47:33+5:30
वादग्रस्त भू-संपादन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार टीका केली़ सरकार शेतकरीविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला़
मी शेतकरी विरोधी नाही -पंतप्रधान
खंडवा (मप्ऱ) : वादग्रस्त भू-संपादन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार टीका केली़ सरकार शेतकरीविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला़
येथील श्रीसिंगाजी औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या प्रत्येकी ६०० मेगावॅटच्या दोन युनिटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मोदी बोलत होते़
नवे भूसंपादन विधेयक आणले म्हणून मी शेतकरीविरोधी असल्याचा कांगावा विरोधक करीत आहेत़ पण मी शेतकरीविरोधी नाही़ मी स्वत: वा माझ्या सरकारने कधीही शेतकऱ्यांचा विरोध केलेला नाही़ आधीच्या संपुआ सरकारने पारित केलेल्या भूसंपादन कायद्यात शाळा, रुग्णालय, निवास, पाणी आणि सिंचन प्रकल्पासाठीची कुठलीही तरतूद केली गेलेली नव्हती़ आम्ही ही तरतूद आणू इच्छितो़ विरोधकांच्या अर्थपूर्ण सूचना वा सुधारणाही आम्ही स्वीकारायला तयार आहोत़ मात्र यावर विरोधक गप्प बसले आहेत, असे मोदी म्हणाले़
आपल्या भाषणात मोदींनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली़ अर्थसंकल्पात सरकारने समाजातील सर्व वर्गांच्या कल्याणासाठी विविध तरतुदी केल्या आहेत़ गरीब, शेतकरी, दलित, आदिवासी सर्वांना न्याय देण्याचे प्रयत्न केले, असे ते म्हणाले़ देशाच्या विकासासाठी वीज उत्पादन आवश्यक असल्याचे सांगत मोदींनी वीज वाचवण्याचे आवाहन केले़ वीज वाचेल तर कोळसा वाचले आणि कोळसा वाचेल तर देशाचे भविष्य सुरक्षित राहील़
आजही देशातील २० टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचलेली नाही़ हजारो गावात अद्यापही विजेचे खांब उभे नाहीत़ खांब आहेत तिथे विजेच्या तारा पोहोचलेल्या नाही़ या सर्वांपर्यंत वीज पोहोचवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले़
रालोआ सरकार सत्तेवर येताच गत ९ ते १० महिन्यांच्या कार्यकाळात वीज उत्पादनात ११ टक्के वाढ झाली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला़ (वृत्तसंस्था)