आयआयएस बंगळुरू देशातील सर्वोत्तम विद्यापीठ! आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानी
By Admin | Updated: April 3, 2017 18:33 IST2017-04-03T18:33:33+5:302017-04-03T18:33:33+5:30
आयआयएस बंगळुरूने देशातील सर्वोत्तम विद्यापीठाचा मान पटकावला आहे.तर आयआयटी मुंबईने तिसरे स्थान पटकावले आहे.

आयआयएस बंगळुरू देशातील सर्वोत्तम विद्यापीठ! आयआयटी मुंबई तिसऱ्या स्थानी
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - आयआयएस बंगळुरूने देशातील सर्वोत्तम विद्यापीठाचा मान पटकावला आहे. देशातील सर्वोत्तम 100 विद्यापीठांची यादी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज प्रसिद्ध केली असून, त्यात आयआयएस बंगळुरूने बाजी मारली. तर आयआयटी मुंबईने तिसरे स्थान पटकावले आहे. आयआयटी मुंबईसह महाराष्ट्रातील इतर आठ विद्यापीठांनी अव्वल 100 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे.
गेल्या काही काळापासून वादात असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठानेही (जेएनयू) पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे. जेएनयू या यादीत सहाव्या स्थानावर आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने या यादीत दहावे स्थान पटकावले आहे. तर अफजल गुरू आणि भारतविरोधी घोषणांमुळे चर्चेत असलेल्या जादवपूर विद्यापीठाने 12 वे स्थान मिळवले आहे.
आज जाहीर झालेल्या यादीत पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणारे आयआयटी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. तर पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे या यादीत 18 व्या क्रमांकावर आहे. त्याबरोबरच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन केंद्र, पुणे (29व्या), डॉ. होमी भाभा राष्ट्रीय संशोधन केंद्र, मुंबई (35 व्या), रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई (41 व्या), टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स, मुंबई (49 व्या), डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (76व्या) , भारती विद्यापीठ, पुणे (90व्या) आणि सिम्बॉयसेस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे (97व्या) या महाराष्ट्रातील विद्यापीठांनी पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये स्थाना मिळवले आहे.
देशातील अव्वल 10 विद्यापीठे पुढीलप्रमाणे
1) आयआयएस बंगळुरू
2) आयआयटी मद्रास
3) आयआयटी मुंबई
4) आयआयटी खडगपूर
5)आयआयटी दिल्ली
6) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली
7) आयआयटी कानपूर
8) आयआयटी गुवाहाटी
9) आयआयटी रुडकी
10) बनारस हिंदू विद्यापीठ
देशातील अव्वल विद्यापीठांची संपूर्ण यादी वाचा या लिंकवर - https://www.nirfindia.org/OverallRanking.html