भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी शनिवारी नवीन वकिलांना विशेष सल्ला दिला आहे. ते म्हणाले, नवीन वकिलांनी आपल्या प्रतिष्ठेला स्वतःपेक्षा वरचढ होऊ देऊ नये. तसेच, त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी अप्रेंटिसशिप करावी, जेणेकरून त्यांना न्यायालयात प्रॅक्टिस करताना काय दबाव असतो, याचा अंदाज येईल. ते आपल्या मुळगावी दारापूर येथे बोलत होते.
गवई म्हणाले, "जर कोणताही अनुभव नसताना, एखाद्या वकिलाची न्यायालयात युक्तिवाद करण्याची इच्छा असेल... आणि सहा महिन्यांत मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या घेण्याची इच्छा असेल, तर आपण त्याचा हेतू समजून घ्यायला हवा."
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सरन्यायाधीश म्हणाले, "मी कनिष्ठ वकिलांना आपल्या वरिष्ठांना खुर्ची देताना बघितले नाही. अशाच एक प्रकार समोर आला होता, एक कनिष्ठ विकालाला न्यायाधिशांनी बरखास्त केले, तेव्हा तो न्यायालयातच बेशुद्ध झाला होता." ते पुढे म्हणाले, न्यायाधीश आणि वकील दोघेही समान भागीदार आहेत. खुर्ची ही जनतेची सेवा करण्यासाठी आहे. त्याच्याशी संबंधित शक्ती डोक्यात शिरता कामा नये.
सरन्यायाधीश येथे त्यांचे वडील आणि केरळ तथा बिहारचे माजी राज्यपाल आर.एस. गवई यांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आले होते. यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी त्यांचे स्वागत केले. याशिवाय, सरन्यायाधीशांनी न्यायालयीन स्वातंत्र्यावर भर दिला. तसेच, आपण निवृत्तीनंतर लगेचच कोणतेही सरकारी पद स्वीकारणार नाही, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.