घरबसल्या 5 कोटींचे बक्षीस जिंका! काळा पैसा, बेनामी मालमत्ता पकडून द्या, इथे तक्रार करा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 09:05 IST2021-01-13T08:46:14+5:302021-01-13T09:05:20+5:30
Income Tax On Black Money : तक्रार दाखल केल्यानंतर प्रत्येक तक्रारीचा एक विशिष्ट नंबर असणार आहे. तक्रारदार वेबलिंकवर त्याने केलेल्या तक्रारीवरील कारवाई पाहू शकतो. या सुविधेद्वारे कोणीही व्यक्ती अगदी तिथे काम करणारा, नातेवाईक, कार्य़कर्ता आयकर विभागाचा गुप्तहेर बनू शकणार आहे.

घरबसल्या 5 कोटींचे बक्षीस जिंका! काळा पैसा, बेनामी मालमत्ता पकडून द्या, इथे तक्रार करा...
नवी दिल्ली : तुमच्या आजुबाजुला असे बरेच शेठ, व्यापारी, राजकारणी महागड्या गाड्यांमधून फिरतात. रुबाब हाणतात. त्यांच्याकडे बराच काळा पैसा किंवा उत्पन्न खूप असते परंतू ते आयकर विभागाला दाखवत नाहीत. अशांबाबत बोटे मोडत बसण्यापेक्षा नामानिराळे राहत त्य़ांची संपत्ती पकडून दिल्यास ५ कोटी रुपयांचे हमखास बक्षिस तुम्हाला मिळू शकते. कसे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आयकर विभागाने एक नवीन ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. याद्वारे एखाद्याकडे काळा पैसा, बेफाम संपत्ती किंवा कर चोरल्याची माहिती असेल तर ती थेट सरकारला देता येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने मंगळवारी ही लिंक सुरु केली आहे. सीबीडीटीने सांगितले की ई-फाइलिंग पोर्टल https://www.incometaxindiaefiling.gov.in वर सोमवारपासून 'कर चोरी किंवा बेनामी मालमत्ता'ची लिंक सुरु केली आहे.
या सुविधेंतर्गत ज्याच्याकडे पॅन किंवा आधार नंबर आहे किंवा ज्याच्याकडे पॅन, आधार नंबर नाहीय तो देखील तक्रार दाखल करू शकणार आहे. या ऑनलाईन सुविधेमध्ये ओटीपी आधारित प्रक्रियेंतर्गत कोणीही आयकर कायदा 1961 चे उल्लंघन, अघोषित संपत्ती कायदा आणि बेनामी व्यवहार कायद्यांतर्गंत तीन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.
५ कोटींचे बक्षिस
तक्रार दाखल केल्यानंतर प्रत्येक तक्रारीचा एक विशिष्ट नंबर असणार आहे. तक्रारदार वेबलिंकवर त्याने केलेल्या तक्रारीवरील कारवाई पाहू शकतो. या सुविधेद्वारे कोणीही व्यक्ती अगदी तिथे काम करणारा, नातेवाईक, कार्य़कर्ता आयकर विभागाचा गुप्तहेर बनू शकणार आहे. त्याला बेनामी संपत्ती प्रकरणात १ कोटी तर विदेशांमध्ये काळेधन ठेवणाऱ्यांची माहिती दिल्यास काही अटींसह 5 कोटी रुपयांचा पुरस्कार देण्याची सोय करण्यात आली आहे.