'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 08:24 IST2025-12-19T08:22:15+5:302025-12-19T08:24:31+5:30
Priyanka Gandhi Nitin Gadkari: वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांनी मतदारसंघातील कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. काही रस्त्यांचे प्रस्ताव प्रियंका गांधींनी गडकरींसमोर मांडले.

'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
खासदार प्रियंका गांधी यांनी लोकसभेचं कामकाज सुरू असताना केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींकडे भेटीसाठी वेळ मागितली. तुमची भेटीची वेळ मिळतच नाहीये, असे हसत हसत प्रियंका गांधी म्हणाल्या आणि गडकरींनी त्यांना आश्वस्त केले. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी गडकरी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी मजेशीर किस्सा घडला.
नितीन गडकरी यांच्या कार्यालयात झालेल्या या भेटीत विकास कामांबरोबरच हलक्या फुलक्या विषयांवरही गप्पा झाल्या. यावेळी नितीन गडकरींनी प्रियंका गांधी यांना खास पदार्थ खाऊ घातला.
भावाचे काम केले बहिणीचे केले नाही, तर...
वायनाड लोकसभा मतदारसंघातील नवी रस्त्याच्या कामासंदर्भात प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. गांधींनी सहा रस्ते बनवण्याचा प्रस्ताव मांडला. रस्ते नसल्यामळे मतदारसंघातील लोकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी नितीन गडकरी त्यांच्या नेहमीच्या शैलीत म्हणाले की, 'यापूर्वी राहुल गांधींसोबत अमेठी मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासंदर्भात चर्चा झाली. राहुलजीचे काम केले आहे. आता तुमचं केलं नाही तर लोक म्हणतील भावाचं काम केलं आणि बहिणीचं काम केलं नाही.'
काही रस्ते राज्याच्या अधिकार क्षेत्रात
गडकरींचं उत्तर ऐकून प्रियंका गांधींसह ऑफिसमध्ये असलेले सगळेच खळखळून हसले. पुढे गडकरी म्हणाले की, 'ज्या सहा रस्त्यांचा प्रस्ताव तुम्ही दिला आहे, त्यातील काही हे राज्य सरकारच्या अधिकारात येतात. त्यामुळे त्यावर केंद्र सरकार निर्णय घेऊ शकत नाही. केंद्र सरकारच्या कक्षेत येणाऱ्या रस्त्यांचे काम केले जाईल, असे आश्वासन त्यांनी प्रियंका गांधींना दिले.
नितीन गडकरींनी खाऊ घातला खास पदार्थ
विकास कामासंदर्भात बैठक झाल्यानंतर नितीन गडकरींनी सगळ्यांना खाऊन जाण्याचा आग्रह केला. गडकरींनी युट्यूबवर बघून तांदुळापासून एक खास पदार्थ बनवला होता. प्रियंका गांधींना त्यांनी तो खाण्याचा आग्रह केला. कार्यालयात आलेल्या सगळ्यांना तो खाण्यासाठी दिला गेला. सगळ्यांनी खाल्ला पण त्याचे नाव मात्र विसरून गेले.