'अमेरिकेसोबत व्यापार करार केला तर मांसाहारी दूध येईल, मग उपवासाचे काय करायचे?', अखिलेश यादव यांनी टॅरिफवर स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:37 IST2025-07-31T11:36:30+5:302025-07-31T11:37:48+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल भारतावर २५ टक्के टॅरिफ लावणार असल्याचे जाहीर केले.

'अमेरिकेसोबत व्यापार करार केला तर मांसाहारी दूध येईल, मग उपवासाचे काय करायचे?', अखिलेश यादव यांनी टॅरिफवर स्पष्टच सांगितले
अमेरिकेने भारतावर २५% कर लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारतीय मार्केटमध्ये गोंधळ उडाला आहे. निफ्टी १७० पेक्षा जास्त अंकांनी घसरणीसह उघडला आणि सेन्सेक्स ६०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. कर जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाढीवर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जर आपण अमेरिकेशी व्यापार करार केला तर मांसाहारी दूध भारतात येईल, तर उपवासाचे काय करणार?'यासह त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
"ते काय बोलत आहेत याने काही फरक पडत नाही, आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, देशात महागाई वाढत आहे. रोजगार नाहीये, सरकार नोकऱ्या देत नाहीये. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची चर्चा होती, पण सरकार ते करू शकलेले नाही. शेतकऱ्यांना खते मिळत नाहीत",असंही अखिलेश यादव म्हणाले.
प्रत्येक वर्षी लाखो लोक देश सोडतायत
"चीनसोबतची आपली व्यापार तूट किती आहे ते तुम्ही पाहता. तुम्ही इतर देशांशी हिशोब करत आहात. तुमच्याच लोकांचे जीवनमान चांगले नाही. 'दरवर्षी लाखो लोक भारत सोडून जात आहेत', असा दावाही यादव यांनी केला. जर अमेरिका हे म्हणत असेल तर ते काही आधारावर ते म्हणत असेल. सरकारने काहीतरी सांगायला हवे, ते ११ वर्षांपासून कोणत्या प्रकारची मैत्री निर्माण करत होते. कारण ११ वर्षांनंतर, आपण या वाईट दिवसांबद्दल आणि या सर्व गोष्टींबद्दल ऐकत आहोत, असंही अखिलेश यादव म्हणाले.
तर नॉनव्हेजिटेरियन उपवास करतील
"जर आपण अमेरिकेसोबत फ्री ट्रेड केले तर नॉनव्हेज दूध भारतात येईल. आमचे मित्र उपवास करतात आणि उपवासामध्ये दूधापासून बनवलेले पदार्थ खाल्ले तर काय होईल.आपण कोणत्या क्षेत्रात फ्री ट्रेड करत आहोत, याबाबत आपल्याला विचार केला पाहिजे, असंही अखिलेश यादव म्हणाले.