नोटाबंदीसाठी दबाव आला असता तर मी राजीनामा दिला असता- पी. चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 21:33 IST2017-10-28T21:31:25+5:302017-10-28T21:33:55+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

नोटाबंदीसाठी दबाव आला असता तर मी राजीनामा दिला असता- पी. चिदंबरम
राजकोट- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. 'मी अर्थमंत्री असतो आणि पंतप्रधानांनी माझ्यावर नोटाबंदीसाठी दबाव आणला असता तर मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता', असं पी. विधान चिदंबरम यांनी केलं आहे.
राजकोट येथे अर्थव्यवस्थेवर व्याख्यान देताना चिदंबरम यांनी नोटाबंदी, बुलेट ट्रेन आणि जीएसटीच्या निर्णयावरून केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे आणि जीएसटीचा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी करण्यात ज्या पद्धतीने घाई करण्यात आली ती खटकणारी आहे. पूर्ण खबरदारी घेऊनच जीएसटीची अंमलबजावणी करायला हवी होती, असं चिदंबरम यांनी म्हंटलं आहे. जीएसटी दर जास्तीत जास्त १८ टक्क्यांपर्यंत असावा असं नमूद करताना अनेक वस्तूंवरील अवाजवी जीएसटी हटवण्याची मागणीही त्यांनी केली.
बुलेट ट्रेन प्रकल्पाला प्राधान्य देण्याऐवजी रेल्वे स्टेशन, कोच, सुरक्षा, स्वच्छता, सिग्नल यंत्रणा, उपनगरीय सेवा सुधारण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचंही चिदंबरम यांनी म्हंटलं. बुलेट ट्रेनच्या एका फेरीत जास्तीत जास्त 600 लोक प्रवार करतील त्यासाठी सरकारने जपानकडून भलीमोठी रक्कम उधार घेतली आहे. बुलेट ट्रेनच्याऐवजी सरकारने या पैशांचा वापर आरोग्या आणि शिक्षण सुधारणेसाठी करायला हवा होता. याची सध्या लोकांना जास्त गरज आहे. बुलेट ट्रेन पुढच्या 10-15 वर्षांनी आपली प्राथमिकता असेल, असं चिदंबरम यांनी म्हंटलं आहे.
यावेळी चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देण्याच्या मागणीचं समर्थन केलं. स्वायत्तता दिल्यानंतरही जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग राहणार असून या मागणीचा विचार करायला हवा, असं चिदंबरम म्हणाले.