नवी दिल्ली : दिल्लीउच्च न्यायालयाने २०१७ मध्ये १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात एका पुरुषाला १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली आहे. पीडित मुलीची साक्ष जर विश्वासार्ह आणि ठाम असेल, तर केवळ त्या आधारावरही दोषसिद्धी करता येते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायाधीश मनोज कुमार ओहरी यांनी ३ सप्टेंबर रोजी या प्रकरणात दोषी ठरलेल्या टोनी नावाच्या व्यक्तीचे अपील फेटाळून लावत हा आदेश दिला.
न्यायाधीश म्हणाले की, कायद्याची भूमिका स्पष्ट आहे. जरी पीडिता ही एकमेव साक्षीदार असली तरी तिची साक्ष विश्वसनीय आणि विश्वासार्ह असल्यास शिक्षा कायम ठेवता येते. विशेषतः अल्पवयीन मुलीची साक्ष जर ठाम असेल, तर त्यावरच निकाल दिला जाऊ शकतो.
न्यायाधीशांनी सांगितले की मुलीचे विधान सुसंगत आणि विश्वासार्ह होते. त्यामुळे आरोपी तिला खोटे ठरविण्यात अपयशी ठरला.
घटना काय? धमकी कोणती?
एफआयआरनुसार, आरोपी मुलीच्या शाळेजवळील फर्निचरच्या दुकानात काम करत होता. त्याने पीडितेला चाऊमीन आणि कचोरीचे आमिष दाखवून अनेक वेळा बलात्कार केला. तसेच, कोणाला काही सांगितल्यास नाल्यात बुडवून टाकीन किंवा लाकडासारखे तुकडे-तुकडे करून टाकेन, अशी धमकीही त्याने दिली होती.
वाढदिवसाच्या दिवशीच सामूहिक बलात्कार
शुक्रवारी कोलकात्यातील रिजेंट पार्क परिसरात एका २० वर्षीय मुलीवर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. कोलकाता पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. चंदन मलिक आणि दीप अशी या दोन्ही आरोपींची ओळख पटली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदेवपूर येथील पीडितेने आरोप केला आहे की, चंदन तिला वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने दीपच्या घरी घेऊन गेला. तिथे त्यांनी जेवण केले. पीडितेने घरी परतायचे असल्याचे सांगितल्यावर आरोपीने तिला जबरदस्ती थांबवून बलात्कार केला.