जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, त्यांना कलमा पढायला लावून तसेच त्यांचे कपडे उतरवून त्यांची धार्मिक ओळख पटवून त्यांना ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आऱोप केला आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या करताना त्यांना धर्म विचारून मग गोळ्या झाडल्या होत्या. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, जर पर्यटकांची हत्या करताना त्यांना धर्म विचारला गेला असेल तर त्यासाठीही भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे. ज्या प्रकारे आपल्या देशात द्वेषाचं राजकारण सुरू आहे, ती कधी ना कधी उलटणार आहे. पहलागममध्ये जे काही घडलंय, त्यासाठी भाजपानं निर्माण केलेली घाण, द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
यावेळी संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा अपयशी गृहमंत्री असा उल्लेख करत त्यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले की, अमित शाह हे अपयशी गृहमंत्री आहेत. मीच नाही तर संपूर्ण देश त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. अमित शाह हे अपशकुनी आणि अपयशी गृहमंत्री आहेत. त्यांना एक मिनिटही पदावर राहण्याचा अधिकार नाही आहे. ते दिवसभर राजकारण, कटकारस्थान करत असतात. हा पक्ष तोडायचा, तो पक्ष तोडायचा, हे चालत असतान तिकडे संपूर्ण देश तुटत आहे. आमची माणसं मारली जात आहेत आणि हे लोक राजकारणात गुंतलेले आहेत.
संजय राऊत यांनी सांगितले की, काल पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आमचे देशभरातील पर्यटक मारले गेले. त्यात महाराष्ट्रामधील सहा जणांचा समावेश आहे. काश्मीरवर केंद्राचं पूर्ण नियंत्रण राहावं यासाठी कलम ३७० हटवलं. जम्मू -काश्मीरला केंद्रशासित बनवलं. त्यामुळे काल पहलगाम येथे जो हल्ला झाला, त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची नाही तर केंद्र सरकारची आहे.
ही दुर्घटना का घडली. यासाठी सरकार जबाबदार आहे, गृहमंत्री जबाबदार आहेत. हा काळ म्हणजे काश्मीरमधील पर्यटनाचा हंगाम आहे. तिथे दोन ते तीन हजार पर्यटक होते. मात्र तिथे सुरक्षा दलांचा एकही जवान तैनात नव्हता. मात्र अमित शाह श्रीनगरमध्ये उतरले तेव्हा तिथे जवळपास ७५ कारचा ताफा होता. तसेच ५०० हून अधिक बंदुकधारी सुरक्षा रक्षक होते. एका व्यक्तीसाठी सुरक्षेचा एवढा लावाजमा होता. मात्र सामान्य जनता जेव्हा तिथे जाते, तेव्हा तिथे त्यांच्यासाठी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नसते. त्याचं कारण म्हणजे आमच्या लष्करामध्ये सुमारे २ लाख पदं रिक्त आहेत. यांना संरक्षणाच्या खर्चात कपात करायची आहे. हे लाडकी बहीण सारख्या योजनांना पैसे वळवतात आणि सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतात, असा दावा संजय राऊत यांनी केला.
नोटाबंदी झाल्यानंतर जम्मू काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात येईल, असं मोदी आणि अमित शाह यांनी सांगितलं होतं. मात्र दहशतवाद वाढत आहे, आणि हे लोक संसदेत खोटं बोलत आहेत. तिथे घडणाऱ्या घडामोडींची माहिती बाहेर येत नाही. काल जे काही घडलं, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जबाबदार आहेत. सरकार जबाबदार आहे. पश्चिम बंगालपासून काश्मीरपर्यंत ज्या प्रकारे देशात द्वेष परवण्याचं काम सुरू आहे, त्याचा हा परिणाम आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.