पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 06:14 IST2025-04-27T06:13:47+5:302025-04-27T06:14:26+5:30

मुद्द्याची गोष्ट : कुत्र्याचे शेपूट हे वाकडे ते वाकडेच, या म्हणीप्रमाणे पाकिस्तानचे वर्तन आहे. यासाठी उपाय म्हणून पाकिस्तानी राज्यकर्ते म्हणजेच त्यांच्या सैन्याला धडा शिकविणे गरजेचे आहे. यासह पाकिस्तानचे तीन तुकडे होणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून पाकची युद्ध क्षमता कमी होईल आणि आपल्यावर होणारे हल्ले थांबतील.

If Pakistan needs to be divided into three parts, its war capacity will be reduced..! | पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त)

हलगाम येथे जो अतिरेकी पहल्ला झाला त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे, याविषयी कुणाच्या मनात शंका नाहीये. प्रश्न असा आहे की, पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा? कारण एवढ्या वर्षांपासून दहशतवादी हल्ले सुरू आहेत. आपण दोन सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर काही काळ हे हल्ले थांबले होते. पण, आता परत अतिरेकी हल्ले सुरू झाले आहेत. कुत्र्याचे शेपूट हे वाकडे ते वाकडेच, या म्हणीप्रमाणे पाकिस्तानचे वर्तन आहे. यासाठी उपाय म्हणून, पाकिस्तानी राज्यकर्ते म्हणजेच त्यांच्या सैन्याला धडा शिकविणे गरजेचे आहे. यासह पाकिस्तानचे तीन तुकडे होणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून पाकची युद्ध क्षमता कमी होईल आणि आपल्यावर होणारे हल्ले थांबतील.

पाकिस्तानी सैन्याचे अथवा तेथील राज्यकर्त्यांचे नुकसान होणे यासाठी गरजेचे आहे की, दरवेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्य लढते. आपण त्यांचे २००-२५० दहशतवादी मारतो; पण, भारतीय सैन्यालादेखील रक्त सांडावे लागते, यात पाकिस्तानी सैन्याचे मात्र काहीच नुकसान होत नाही. पाकिस्तानात भाडोत्री दहशतवादी अगदी स्वस्त दरात (३ ते ४ हजारांत) मिळतात. पाकिस्तानचे नुकसान होण्यासाठी आपल्याकडे असलेल्या पर्यायांमध्ये, युनायटेड नेशन्स स्तरावर सिक्युरिटी काऊन्सिलकडे आपण प्रस्ताव सादर करून, पाकिस्तान म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश म्हणून नॉमिनेट करण्यास सांगू शकतो.

जेणेकरून संपूर्ण जग पाकिस्तानवर आर्थिक बहिष्कार टाकेल. हा एक मोठा पर्याय ठरू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत सिंधू नदी करार आहे, तो करार मोडून पाकिस्तानला जाणारे पाणी आपण थांबवू शकतो, यामुळे पाकिस्तानात पाण्याची मोठी समस्या निर्माण होईल.

तिसरा पर्याय म्हणजे, वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक बहिष्कार पाकिस्तानवर टाकले जाऊ शकतात. कोणताही व्यापार पाकिस्तानसोबत केला नाही, तरी त्यात त्या देशाचे मोठे नुकसान होईल.

आपल्याकडे सगळी क्षमता

मिलिटरी उपायांबाबत बोलायचे तर अनेक उपाय आहेत. जसे, पुन्हा सर्जिकल स्ट्राईक, आपल्यासमोर जे पाकिस्तानी सैन्य उभे आहे त्यांच्यावर तोफखान्याच्या, क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ला करणे अथवा लाँग रेंज हत्यारांच्या मदतीने हल्ला करणे, थेट एलओसी ओलांडून पाकिस्तानात जाऊन पारंपरिक युद्धासारखा हल्ला करणे अथवा एक मोठे युद्धच करणे अशी सगळी क्षमता आपल्याकडे आहे. यापैकी नेमके काय करता येईल याचे विश्लेषण करून कोणता उपाय करायचा हे ठरवावे लागेल. जेणेकरून पाकिस्तानची वागणूक सुधारेल.

पाकिस्तानच्या हस्तकांना कठोर शिक्षा मिळायला हवी

पाकला चीनची मदत आहे. भारतातही पाकचे हस्तक असल्याने, त्यांना शोधून कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. पहलगाम हल्ल्याचा विचार केला तर, दहशतवादी पाकिस्तानातून येऊन हल्ला करू शकत नाहीत. त्यांना कुणीतरी राहायला जागा दिली, जेवायला दिले, गाईड म्हणून मदत केली, दारूगोळा पुरवण्याचे काम केले.

२ भारतीय सैन्याच्या पाठीशी संपूर्ण भारतीय उभे राहून पाकविरोधात कारवाई करण्यासाठी मॉरल, फिजिकल अथवा आर्थिक यापैकी जो सपोर्ट पाहिजे तो देतील. भारतीयांनीही आपापसातील वाद थांबवून एकत्र येणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढील काही वर्षात पाकिस्तानला मोठा धडा शिकवता येईल.

- शब्दांकन : नितीश गोवंडे

Web Title: If Pakistan needs to be divided into three parts, its war capacity will be reduced..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.