CM Yogi on Samajwadi party : प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभाच्या आयोजनावर टीका आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्या समाजवादी पक्षावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार हल्लाबोल केला. 'महाकुंभाच्या मुद्द्यावर राजकारण करणे योग्य नाही. सनातन धर्मातील मोठ्या उत्सवाचे आयोजन करणे गुन्हा आहे का? हा गुन्हा असेल, तर आमचे सरकार पुन्हा-पुन्हा हा गुन्हा करेल,' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
उत्तर प्रदेश विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी पुढे म्हणतात, 'आम्ही 24-25 कोटी लोकांना वाचवण्याचे काम करत होतो, तेव्हा हेच लोक आमची चेष्टा करत होते. अयोध्येत रामलाल विराजमान झाल्यावर समाजवादी पक्षाने त्याचा विरोध केला. मी माननीय सभापतींना सांगेन की, सर्व सदस्यांना महाकुंभात न्यावे. प्रत्येकाने श्रद्धेची डुबकी घ्यावी. सर्वांना संधी मिळाली पाहिजे. आमचे सरकार सर्वांना जोडण्याचे काम करते.'
महाकुंभाच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, '2013 मध्ये 55 दिवसांचा महाकुंभ आयोजित करण्यात आला होता, तर यावेळी 45 दिवसांचा होता. आम्ही त्याचे क्षेत्र 10 हजार एकरांपेक्षा जास्त वाढवले. 1,850 हेक्टर क्षेत्रफळाची सुविधा लोकांना पार्किंगसाठी देण्यात आली आहे. 2013 मध्ये एकही कायमस्वरूपी घाट बांधला नव्हता, पण यावेळी 60 घाट आणि 14 नवीन उड्डाणपूल बांधण्यात आले. संगमपर्यंत बसेसही पोहोचू लागल्या आहेत.'
'महाकुंभ हा कोणत्याही सरकारची नाही, समाजाचा आहे. सरकार केवळ सेवक म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. आम्हाला आमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे. या कार्यक्रमासंदर्भातील सर्व अफवांकडे दुर्लक्ष करून संपूर्ण जगाने यात सहभाग दर्शविला आहे. चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्यांसोबत आमच्या संवेदना आहेत. संगमाचे पाणी आंघोळीसाठी योग्य आहे. प्रदूषण नियंत्रण कक्ष सातत्याने संगमावर कार्यरत आहे. संगमाच्या पाण्याबाबत खोटा प्रचार करण्यात आला. यामध्ये सपा आणि विरोधी पक्षातील लोकांचा समावेश आहे,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.