मोदीजी छाती ठोकून झाली असेल, तर जरा याचं उत्तर देणार का ? राहुल गांधींचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 14:49 IST2017-10-06T14:48:42+5:302017-10-06T14:49:52+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली असून छाती ठोकून झाली असेल, तर कृपया स्पष्टीकरण देणार का ? असा सवाल विचारला आहे

मोदीजी छाती ठोकून झाली असेल, तर जरा याचं उत्तर देणार का ? राहुल गांधींचा सवाल
नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली असून छाती ठोकून झाली असेल, तर कृपया स्पष्टीकरण देणार का ? असा सवाल विचारला आहे. चीनने डोकलाममध्ये रस्ता बनवण्यास सुरुवात केली असल्याच्या पार्श्वभुमीवर राहुल गांधी यांनी हा प्रश्न विचारला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनसोबत सुरू असलेल्या डोकलाम वादावर तोडगा निघून एक महिनादेखील सरलेला नसताना चीननं पुन्हा डोकलाम परिसरात रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी काम करत असलेल्यांना 500 चिनी सैनिकांचं संरक्षण देण्यात आले आहे.
Modiji, once you're done thumping your chest, could you please explain this?https://t.co/oSuC7bZ82x
— Office of RG (@OfficeOfRG) October 6, 2017
डोकलामवर भूतान आणि चीन हे दोन्ही देश दावा सांगत आहेत आणि भारत यावर भूतानचं समर्थन करत आहे. मात्र या प्रकरणात चीनकडून लष्करी बळाचा वापर करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. त्यामुळे भूतानच्या रक्षणासाठी तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या संमतीनेच हिंदुस्थानने स्वतःचे लष्करी सामर्थ्य वापरण्याची तयारी ठेवली आहे.
जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं. या रस्त्याची निर्मिती चिकन नेक नावानं ओळखल्या जाणा-या भारतीय जमिनीजवळ केली होती. दरम्यान हा परिसर भारतासाठी भौगोलिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असा आहे. दरम्यान डोकलाम विवादावर जवळपास 70 दिवस भारत-चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यानंतर उपाय योजना काढत हा वाद मिटवण्यात आला होता आणि दोन्ही देशांनी आपआपल्या सैनिकांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता.
यावेळी चीनने आपले बुलडोझर आणि रस्ता बनवण्याचे इतर सामान हटवल्याचे भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तर, रस्ता बनवण्याचे काम हे हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असेल, असे चीनी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, आता चीनने ज्या भागात रस्त्याचे काम करण्यावरुन तणाव निर्माण झाला होता त्या ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावर आता रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आला आहे. नव्या रस्त्याच्या सुरक्षेसाठी चीनने तब्बल 500 सैनिक या परिसरात तैनात केले आहेत.