Karnataka Elections results: भाजपाला स्वत:वर विश्वास असेल तर बॅलेट पेपरने निवडणुका घ्याव्यात; उद्धव ठाकरेंचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 14:40 IST2018-05-15T14:40:15+5:302018-05-15T14:40:15+5:30
देशातलं वातावरण एक असंत आणि निकाल वेगळेच लागतात

Karnataka Elections results: भाजपाला स्वत:वर विश्वास असेल तर बॅलेट पेपरने निवडणुका घ्याव्यात; उद्धव ठाकरेंचे आव्हान
मुंबई: देशात भाजपाविरोधी वातावरण असतानाही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश हे एकप्रकारचे गूढच म्हणायला हवे, अशी प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्याच्या घडीला देशातलं वातावरण एक आहे, तशाचप्रकारचे अंदाजही व्यक्त केले जातात. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकांचे निकाल हे वेगळेच लागतात. विरोधी पक्ष यावरून मतदान यंत्रात (ईव्हीएम) काळबेरं असल्याचा आरोपही करतात. त्यामुळे भाजपाने या प्रकरणाचा एकदा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा. भाजपाला स्वत:वर विश्वास असेल तर त्यांनी ईव्हीएम मशिनऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान उद्धव यांनी दिले.
कर्नाटक निवडणुकीतील यशाबद्दल मी भाजपाचे अभिनंदन करतो. सध्याच्या घडीला मला यावर जास्त बोलायचे नाही. मात्र, सध्याची एकूणच परिस्थिती पाहता यापूर्वी सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये भाजपाला यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे भाजपशासित राज्यांतील जनतेचा खरा कौल 2019 साली कळेल, असेही उद्धव यांनी म्हटले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने मेहनत केली. त्यानुसार त्यांना कमी-अधिक प्रमाणात यश मिळाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबद्दल बोलायचे झाले तर प्रत्येक नेत्याला आयुष्यात आव्हानं व यशापयशाचा सामना करावा लागतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.