आयबी अधिकाऱ्याने दिली बाॅम्बची खाेटी माहिती; पाेलिसांसाेबत संयुक्त चाैकशीनंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 06:01 IST2024-12-11T06:01:13+5:302024-12-11T06:01:29+5:30
दाेन महिन्यांमध्ये विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्रच सुरू झाले हाेते. ८०० पेक्षा जास्त विमानांसंदर्भात अशा धमक्या प्राप्त झाल्या हाेत्या.

आयबी अधिकाऱ्याने दिली बाॅम्बची खाेटी माहिती; पाेलिसांसाेबत संयुक्त चाैकशीनंतर अटक
रायपूर : गेल्या दाेन महिन्यांमध्ये विमानांमध्ये बाॅम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्रच सुरू झाले हाेते. ८०० पेक्षा जास्त विमानांसंदर्भात अशा धमक्या प्राप्त झाल्या हाेत्या. यासंदर्भात काही जणांना अटक करण्यात आली. मात्र, त्यात एक जण गुप्तचर विभागाचा (आयबी) असल्याचे उघडकीस आले आहे. अनिमेष मंडल, असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडल यांनी १४ नाेव्हेंबरला नागपूर-काेलकाता इंडिगाेच्या विमानात बाॅम्ब ठेवण्यात आल्याची माहिती चालक दलाला दिली हाेती. त्यानंतर विमानाचे छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले. विमानात १८७ प्रवासी हाेते. तपासानंतर बाॅम्बची माहिती चुकीची निघाली. त्यानंतर मंडल यांना खाेटी माहिती दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
मंडल हे उपाधीक्षक दर्जाचे अधिकारी असून, ते नागपुरात तैनात आहेत. ते निर्दाेष असून, त्यांना प्राप्त झालेली माहिती दिल्याचे काम त्यांनी केले, असे त्यांचे वकील फैझल रिझवी यांनी सांगितले. मात्र, रायपूरचे वरिष्ठ पाेलिस अधीक्षक संताेष सिंह यांनी सांगितले की, पाेलिसांनी त्याच दिवशी याबाबत आयबीला माहिती दिली हाेती. त्यानंतर मंडल यांची संयुक्त चाैकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. मंडल यांनी प्रवाशांमध्ये दहशत पसरविली, असे सिंह यांनी
सांगितले. (वृत्तसंस्था)
छत्तीसगडमध्ये खटला चालणार नाही?
पाेलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय न्याय संहिता व नागरी विमान वाहतूक सुरक्षा अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
त्यासाठी विशेष न्यायालयाची गरज असते. ते छत्तीसगडमध्ये नाही. तर, जामीन आणि प्रकरण स्थानांतरीत करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेऊ, असे मंडल यांच्या वकिलांनी सांगितले.