तरुणी पांडे हिने फक्त ४ महिन्यांच्या तयारीसह भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली UPSC उत्तीर्ण केली. कोणतंही कोचिंग न घेता आत्मविश्वास, यूट्यूब व्हिडीओ आणि स्वतःच्या नोट्सच्या मदतीने तिने हे घवघवीत यश मिळवलं आहे. तरुणीने UPSC प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत परीक्षांमध्ये तिच्या स्पेशल रणनीतीचा वापर केला आणि २०२१ मध्ये १४ वा रँक मिळवला.
पश्चिम बंगालमधील चित्तरंजन येथील तरुणीने झारखंडमधील जामतारा येथे शिक्षण घेतलं आहे. डॉक्टर होण्याचं तिचं लहानपणापासून स्वप्न होतं. पण तब्येतीमुळे तिने एमबीबीएसचं शिक्षण अर्धवट सोडलं. या कठीण काळात तिने हार मानली नाही आणि नागरी सेवांसाठी तयारी सुरू केली. तरूणीच्या बहिणीच्या नवऱ्याचं जेव्हा निधन झालं तेव्हा तिचं आयुष्य थोडं बदललं. ती बहिणीसोबत सरकारी कार्यालयाच्या चकरा मारत असाना तिथे तिला धक्कादायक परिस्थिती दिसली.
हीच परिस्थिती बदलण्यासाठी तिने अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. २०२० मध्ये, जेव्हा ती UPSC प्राथमिक परीक्षेला बसणार होती, तेव्हा फक्त चार दिवस आधी तिला कोरोना झाला. असं असूनही, तिने परीक्षा दिली आणि पुढच्या वर्षी शेवटच्या प्रयत्नात १४ वा रँक मिळवला. जनरल कॅटेगिरीतील वयोमर्यादेमुळे, २०२१ हा तिचा शेवटचा प्रयत्न होता. त्यामुळे खूप मेहनत केली.
परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंगवर अवलंबून राहण्याऐवजी तरुणीने ऑनलाइन संसाधनांचा वापर केला. यूट्यूब व्हिडीओ आणि स्वत: बनवलेल्या नोट्समधून अभ्यास केला. चार महिन्यांच्या काळात तिने पाठ्यपुस्तक आणि व्हिडीओ यांची सांगड घालून एक अभ्यासाचं वेळापत्रक तयार केलं आणि यश मिळवलं. तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.