चीनचा मुकाबला करण्यासाठी IAF ची 'सी-130 जे हरक्युलिस' विमाने सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 16:51 IST2017-08-24T16:39:53+5:302017-08-24T16:51:40+5:30
चीनकडून वारंवार युद्धाची धमकी दिली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने पूर्वेकडचा पनागड येथील अर्जन सिंग हवाई तळ पूर्णपणे सज्ज ठेवला आहे.

चीनचा मुकाबला करण्यासाठी IAF ची 'सी-130 जे हरक्युलिस' विमाने सज्ज
कोलकाता, दि. 24 - चीनकडून वारंवार युद्धाची धमकी दिली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने पूर्वेकडचा पनागड येथील अर्जन सिंग हवाई तळ पूर्णपणे सज्ज ठेवला आहे. इथे भारतीय वायू दलाची सहा सी-130 जे सुपर हरक्यूलिस विमाने पूर्णपणे सज्ज आहेत. जून महिन्यात भारत आणि चीनमध्ये डोकलाममध्ये संघर्ष सुरु झाला होता. जुलैच्या शेवटच्या आठवडयात अर्जन सिंह हवाई तळाला आपातकालीन परिस्थितीसाठी तयार करण्यात आले.
गाझियबाद येथील हिंडन तळानंतर पनागड हा सी-130 जे विमानांचा देशातील दुसरा तळ आहे. पनागडमध्ये मागच्या दोन वर्षांपासून लॉकहीड मार्टीनचे इंजिनिअर आणि टेक्निशिअन हँगर आणि अन्य सुविधांची उभारणी करत आहेत. 2011 सालापासून सी-130 जे विमाने भारतात यायला सुरुवात झाली. हिंडनमध्ये या विमानांचा पहिला तळ बनवण्यात आला.
सी-130 जे सुपर हरक्यूलिस हे फक्त मालवाहतुक विमान नसून, या विमानामध्ये काही अन्य क्षमताही आहेत. ज्यामुळे युद्धकाळात हे विमान अत्यंत महत्वपूर्ण ठरु शकते. भारताच्या ईशान्येकडची सीमा चीनला लागून आहे. या ठिकाणी छोटया धावपट्ट्यांवरही हे विमान सहज लँडींग करु शकते.
चीनकडून सध्या वारंवार भारताला धमकी दिली जात आहे. भारताच्या सीमेवरील इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्कमुळे आम्हाला धोका निर्माण होतोय असे कारण पुढे करुन उद्या आम्ही आमचे सैन्य घुसवले तर, खरोखरच भारतात अराजकता निर्माण होईल अशी धमकी चीनने दिली.
आपल्या लष्करी ताकतीच्या बळावर चीन भले वारंवार युद्धाची गर्जना करत असेल, पण उद्या दोन्ही देशांमध्ये असे युद्ध भडकलेच तर चीनला त्यात कुठलाही फायदा होणार नाही. वरिष्ठ सरकारी पातळीवरील विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. डोकलामच्या चिघळत चाललेल्या संघर्षाचे उद्या युद्धात पर्यावसन झाले तर, चीनला प्रादेशिक आणि रणनितीक दोन्ही आघाडयांवर लाभ होणार नाही. फक्त दोन्ही बाजूला रक्तपात होईल. या युद्धातून कोणीही विजेता किंवा पराभूत ठरणार नाही. उलट चीनला 1962 सारखा युद्धाचा निकाला लावता आला नाही तर, आशियातील चीनचे वर्चस्व संपून जाईल