मला पाकमधील चित्रपट, मालिकांमध्ये काम करायला आवडेल - परेश रावल
By Admin | Updated: June 6, 2017 20:17 IST2017-06-06T20:17:52+5:302017-06-06T20:17:52+5:30
पाकिस्तानमधील चित्रपट आणि मालिकांमध्ये मला अभिनय करण्यास आवडेल, असे बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी म्हटले आहे.

मला पाकमधील चित्रपट, मालिकांमध्ये काम करायला आवडेल - परेश रावल
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 06 - पाकिस्तानमधील चित्रपट आणि मालिकांमध्ये मला अभिनय करण्यास आवडेल, असे बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी म्हटले आहे.
मला पाकिस्तानमधील चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करायला नेहमीच आवडेल. पाकिस्तानमधील "हमसफर" यांसारख्या सर्व मालिका माझ्या पसंतीच्या आहेत. ज्याप्रकारे तेथील मालिकांमध्ये अभिनय करण्यात येतो. तसेच, तेथील मालिकांमधील कहानी, लेखन, भाषा अशा सर्वच गोष्टी चांगल्या आहेत. त्यामुळे मला वाटते की, आपल्याकडील शो कंटाळवाणे आहेत, असे परेश रावल यांनी पीटीआयला सांगितले.
कलाकार आणि क्रिकेटर कधीही बॉम्ब फेकत नाहीत किंवा ते दहशतवादी नाहीत. याशिवाय कलाकार आणि क्रिकेटर दोन्हीं देशातील संबंध सुधारण्याचे काम करतात, असेही परेश रावल म्हणाले. तसेच, त्यांनी असेही स्पष्ट केले की, मी पाकिस्तानच्या कलाकारांवर घातलेल्या बंदीच्या बाजूने नाही.
दरम्यान, गेल्या वर्षी निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या "ए दिल है मुश्किल" चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने काम केले होते. मात्र, जम्मू-काश्मीरमधील उरी येथील पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार काम करत आहेत, त्या चित्रपटांवर बंदीची मागणी मनसेकडून करण्यात आली होती. त्यावर दिग्दर्शक-निर्माते करण जोहर यांनी यापुढे पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा चित्रपटात घेणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर "ए दिल है मुश्किल" चित्रपट रिलीज करण्यात आला होता.