गेल्या काही दिवसांमध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक संबंधातील वादविवादातून होणाऱ्या गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यातून सर्वांना अवाक् करणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका प्रियकराने त्याच्या मृत प्रेयसीच्या मृतदेहासोबत लग्न केलं. यावेळी लग्न लावण्यासाठी उपस्थित असलेल्या पुरोहितांनाही मंत्र म्हणणे जड गेले. तर उपस्थित नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.
महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने आपलं दुकान सुरू केलं होतं. यादरम्यान, तो तिथेच घरमालकाच्या मुलीच्या प्रेमात पडला. दोघांच्या प्रेमप्रकरणाबाबत कळलं तेव्हा सुरुवातीला कुटुंबीयांनी नकार दिला. मात्र दोघांनीही हट्ट केल्याने अखेर नातेवाईकांनी या लग्नाला मान्यता दिली. मात्र नंतर काही कारणाने या तरुणीने गळफास घेत जीवन संपवलं.
प्रेयसीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच तरुणाला धक्का बसला. तो शोकाकुल अवस्थेत प्रेयसीच्या घरी पोहोचला. मी तिला पत्नी बनवण्याचं वचन दिलं होतं, मी आता तिच्यासोबत संसार करू शकत नाही, पण तिची अंत्ययात्रा विवाहित म्हणून निघेल, असं त्याने तिच्या नातेवाईकांना सांगितलं. त्याचं हे बोलणं ऐकून नातेवाईक अवाक् झाले. काही वेळ विचार केल्यावर त्यांनी या लग्नाला मान्यता दिली.
अखेर शोकाकुल वातावरणातच एका पुरोहितांना बोलावण्यात आले. त्यानंतर या तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या मृतदेहासोबत लग्न केले. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले. आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.