विवाहोत्सुक तरुणांची रखडलेली लग्नं हा देशपातळीवर गंभीर विषय बनलेला आहे. खूप शोधाशोध करूनही अविवाहित वरांना वधू मिळणं कठीण झालं आहे. दरम्यान, राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात यामधूनच एक अजब घटना समोर आली आहे. एनटीआर गावातील श्रवण सुथार नावाच्या तरुणाने पंचायत समितीचे विकास अधिकारी आणि नायब तहसीलदारांना लग्न लावून देण्याबाबत एक पत्र दिलं आहे.
या पत्रामध्ये श्रवणने लिहिले की, माझे आई वडील आता वृद्ध झाले आहेत. मी गरीब मजूर आहे. दररोज मोलमजुरी करण्यासाठी मी घराबाहेर राहतो. त्यामुळे मी आई-वडिलांची काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे माझं लग्न लावून द्यावं. लग्न झालं की मी घर सोडून कामावर जाऊ शकेन. तर माझी पत्नी आई-वडिलांची सेवा करेल.
श्रवणने लिहिले की, मी ३३ वर्षांचा आहे. मात्र अजून माझं लग्न झालेलं नाही. दरम्यान, हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे. खरंतर कुठल्याही व्यक्तीने केलेल्या अर्जावरून त्याचं लग्न लावून देण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही. मात्र तरीही अधिकाऱ्यांनी या पत्राची गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच श्रवण याला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काही करता येईल का? याबाबच चाचपणी सुरू केली आहे.