संसदेत विरोधकांच्या गदारोळात अनेकदा कामकाज तहकूब करण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार संसदेच्या प्रांगणात आंदोलन करत आहेत. त्यातच राज्यसभेत मोठी खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. काँग्रेस सदस्यांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडल्याने खळबळ उडाली आहे. नोटांचे बंडल सापडलेली जागा काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांची असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता यावर मनू सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आता काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी या मुद्द्यावरून स्पष्टीकरण दिले आहे सिंघवी म्हणाले, 'हे मी पहिल्यांदाच ऐकले आहे, मी जेव्हाही राज्यसभेत जातो तेव्हा ५०० रुपयांची नोट सोबत घेतो. काल दुपारी १२.५७ वाजता मी सदनमध्ये पोहोचलो आणि १ वाजता सदन सुरू झाले. त्यानंतर मी खासदार अयोध्या रामी रेड्डी यांच्यासोबत दुपारी दीड वाजेपर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो आणि मग संसदेतून बाहेर पडलो, असं स्पष्टीकरण मनू सिंघवी यांनी दिले.
सापडलेल्या नोटांबाबत शुक्रवारी अध्यक्ष जगदीप धनखर यांनी माहिती दिली. 'काल गुरुवारी सभागृह तहकूब झाल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली की सीट क्रमांक २२२ मधून रोख रक्कम सापडली आहे. ही जागा तेलंगणाचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास नियमानुसार व्हायला हवा आणि तोही केला जात आहे.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी नोटा मिळाल्याचे सांगताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'जोपर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि सर्वकाही स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांचे नाव बोलायला नको होते.' खरगे यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ केला. त्यावर खरगे म्हणाले की, अशी चिखलफेक करून देशाची बदनामी केली जात आहे. तुम्ही कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नाव आणि जागा याबद्दल कसे म्हणू शकता? खरगे यांच्या आरोपांवर सभापती म्हणाले की, ती कोणत्या जागेवर सापडली हे सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा म्हणाले, 'ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे. हा सभागृहाच्या प्रतिष्ठेवरचा हल्ला आहे. योग्य तपास होईल, असा मला विश्वास आहे. मला आशा होती की आमचे विरोधी पक्षनेतेही सविस्तर चौकशीची मागणी करतील. तपशील बाहेर आला पाहिजे. याचा दोन्ही पक्षांनी निषेध केला पाहिजे, असंही ते म्हणाले.