श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी इंडिगोचे विमान '६ ई २१४२'हे खराब हवामानामुळे आपत्कालीन परिस्थितीत जमिनीवर उतरवण्यात आले. यावेळी विमान एका वादळात अडकले होते आणि त्यामुळे विमानाच्या पुढच्या भागाला मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आता विमानातील दृश्यांचे थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या विमानातून प्रवास करणाऱ्या सागरिका घोष यांनी त्यांची आपबिती सांगितली आहे.
इंडिगोच्या या विमानात एकूण २०० प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप असून, कोणालाही शारीरिक इजा झाली नाही, मात्र प्रवास अत्यंत धोकादायक ठरला. प्रवाशांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष, डेरेक ओ'ब्रायन, नदीमुल हक, मानस भुनिया आणि ममता ठाकूर यांचा समावेश होता. हे पाच सदस्यीय शिष्टमंडळ जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर होते.
तो मृत्यूसारखा अनुभव होता : सागरिका घोष
विमानतळावर सुरक्षितपणे उतरल्यावर सागरिका घोष यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “हा मृत्यूसारखा अनुभव होता. मला वाटलं की आता आपलं आयुष्य संपणार आहे. लोक घाबरले होते, ओरडत होते, प्रार्थना करत होते. आमचा जीव वाचवल्याबद्दल पायलटचे आभार मानतो. लँडिंगनंतर आम्ही पाहिलं की विमानाच्या मागच्या भागाला मोठं नुकसान झालं होतं.” या घटनेनंतर संपूर्ण शिष्टमंडळाने वैमानिकाचे कौतुक करत त्याचे आभार मानले.
टीएमसी शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरमध्ये!
तृणमूल काँग्रेसचे शिष्टमंडळ २३ मेपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये पूंछ, राजौरी आणि श्रीनगर या ठिकाणी भेट देणार आहे. पक्षाने स्पष्ट केलं आहे की, हे शिष्टमंडळ पाकिस्तानच्या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या सीमावर्ती भागांतील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी तिथे गेले आहे.
सागरिका घोष म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या पाकिस्तानच्या गोळीबारात सीमावर्ती गावांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागाकडे दुर्लक्ष न करता योग्य मदत आणि पुनर्वसन देणं आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.