या क्षणाला माझा तुमच्यावर विश्वास नाहीय; हवाई दल प्रमुखांनी हिंदुस्तान एरोनॉटीक्सवर व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:02 IST2025-02-11T18:02:07+5:302025-02-11T18:02:37+5:30
पाकिस्तान एकीकडे चीनकडून अद्ययावत लढाऊ विमाने घेण्याच्या तयारीत आहे. चीन दुसऱ्या बाजुने भारताच्या सीमेवर शस्त्रास्त्रे वाढवत आहे. अशातच भारताकडे मात्र, तीच जुनी लढाऊ विमाने आणि शस्त्रे आहेत.

या क्षणाला माझा तुमच्यावर विश्वास नाहीय; हवाई दल प्रमुखांनी हिंदुस्तान एरोनॉटीक्सवर व्यक्त केली नाराजी
तेजस लढाऊ विमानांच्या डिलिव्हरीला होत असलेल्या विलंबावरून हवाई दल प्रमुखांनी सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला चांगलेच सुनावले आहे. याबाबतचा व्हिडीओ नॅशनल डिफेंस या न्यूज पोर्टलने पोस्ट केला असून हलच्या प्रमुखांनाच हे बोल सुनावल्याने कंपनीसाठी ही चिंतेची बाब बनली आहे.
पाकिस्तान एकीकडे चीनकडून अद्ययावत लढाऊ विमाने घेण्याच्या तयारीत आहे. चीन दुसऱ्या बाजुने भारताच्या सीमेवर शस्त्रास्त्रे वाढवत आहे. अशातच भारताकडे मात्र, तीच जुनी लढाऊ विमाने आणि शस्त्रे आहेत. हल हवाई दलाला तेजस लढाऊ विमानांची पुढची पिढी देणार आहे. परंतू, अमेरिकेने या लढाऊ विमानांच्या इंजिनाला विलंब केला आहे. तसेच हलमध्ये अंतर्गत समस्या आहेत. यामुळे या फेब्रुवारीत हवाई दलाला मिळणारी ११ लढाऊ विमाने मिळू शकलेली नाहीत.
एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी आज हलला भेट दिली. यावेळी त्यांना HJT-36 Yashas दाखविण्यात आले. सिंग हे या विमानाच्या कॉकपिटमध्ये बसत असताना त्यांनी माझा तुमच्यावर विश्वास नाहीय, असे स्पष्ट शब्दांत सांगून टाकले आहे. मला हलवर विश्वास नाहीय, ही गंभीर बाब आहबे. मी तुम्हाला केवळ माझी गरज आणि चिंताच सांगू शकतो. तुम्हाला ती दूर करावी लागेल. आम्हाला विश्वास द्यावा लागेल. आतातरी मला तुमच्यावर विश्वास नाहीय. मला वाटतेय की हल मिशन मोडवर काम करत नाहीय. मला ११ तेजस Mk1A विमाने देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतू एकही विमान अद्याप तयार नाहीय, अशा शब्दांत सिंग यांनी नाराजी व्यक्त केली.
हवाई दल प्रमुखांनी एअरो इंडिया २०२५ मध्ये देखील हलवर टीका केली होती. तुम्ही जे विमान आता Mk1A असल्याचे भासवून उडविले आहे ते खरे Mk1A नाहीय. सॉफ्टवेअर किंवा दिसण्यात बदल करून असे होणार नाही. जेव्हा त्यात शस्त्रास्त्रे आणि क्षमता येईल तेव्हाच ते खरे लढाऊ विमान असेल अशा शब्दांत सिंग यांनी फटकारले होते. यात काहीच मजा आली नाही, असे सिंग म्हणाले होते.
महत्वाचे म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच तेजसवरून हलची प्रशंसा केली होती. यानंतर सिंग यांचे विरोधी वक्तव्य आल्याने चिंतेची बाब मानली जात आहे. यावर प्रसारमाध्यमांनी सिंग यांचे म्हणणे नकारात्मक दाखविल्याचे हवाई दलाने म्हटले आहे.