"मी ऐकलं नाही... मला माहीत नाही..."; बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावर फारूक अब्दुल्लांचं धक्कादायक विधान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 16:09 IST2024-12-07T16:07:36+5:302024-12-07T16:09:17+5:30
जेकेएनसीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचारासंदर्भात मोठे विधान केले आहे. यासंदर्भात आपण पंतप्रधानांना विचारा, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

"मी ऐकलं नाही... मला माहीत नाही..."; बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावर फारूक अब्दुल्लांचं धक्कादायक विधान!
बांगलादेशातील सत्तांतरानंतर, तेथे सातत्याने अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. तेथे हिंदूंवर सातत्याने हल्ले होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यासंदर्भात संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यातच, आता जेकेएनसीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी बांगलादेशातीलहिंदूंवर होत असलेल्या हिंसाचारासंदर्भात मोठे विधान केले आहे. यासंदर्भात आपण पंतप्रधानांना विचारा, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले फारूख अब्दुल्ला? -
बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावर जेकेएनसीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला म्हणाले, "मी यासंदर्भात ऐकले नाही, मला माहित नाही, यामुळे मी यावर भाष्य करणार नाही. यासंदर्भात आपण पंतप्रधानांना विचारायला हवे." तत्पूर्वी, बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी धार्मिक गुरुंची भेट घेतली होती. यानंतर, अल्पसंख्यकांवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात अचूक माहिती मागवली होती.
जम्मू: बांग्लादेश में हिंदुओं के खिलाफ हिंसा पर जेकेएनसी अध्यक्ष फारूक अब्दुल्ला ने कहा, "मैंने इसके बारे में नहीं सुना है, मुझे नहीं पता, इसलिए मैं इस पर कोई टिप्पणी नहीं करूंगा। आपको इस बारे में प्रधानमंत्री से पूछना चाहिए।" pic.twitter.com/kptsQ6c6EC
— IANS Hindi (@IANSKhabar) December 7, 2024
आसाममधील हॉटेल्समध्ये बांगलादेशींना प्रवेशबंदी -
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा भारतात अनेक ठिकाणी निषेध केला जात आहे. यातच आता, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवर होणारे हल्ले जोवर बंद होत नाहीत, तोवर कुण्याही बांगलादेशी नागरिकाला आपण आपल्या सेवा देणार नाही, अशी घोषणा आसाममधील बराक खोऱ्यातील हॉटेल्सनी घेतली आहे. बराक खोऱ्यातील कछार, श्रीभूमी (पूर्वीचे करीमगंज) आणि हायलाकांडी (Hailakandi) या तीन जिल्ह्यांमधील हॉटेल्समध्ये बांगलादेशींना प्रेवशबंदी करण्यात आली आहे.
बांगलादेशच्या दूतावासापर्यंत काढला जाणार निषेध मोर्चा -
यातच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) दिल्ली युनिटचे मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे सह-प्रभारी रजनीश जिंदाल यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यक समुदायांवरील हल्ल्यांच्या विरोधात, 200 हून अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नागरी मंडळाचे सदस्य पुढील आठवड्यात बांगलादेशी दूतावासापर्यंत निषेध मोर्चा काढतील. 'सिव्हिल सोसायटी ऑफ दिल्ली' या बॅनरखाली 10 डिसेंबर रोजी हा मोर्चा काढण्यात येईल. महत्वाचे म्हणजे, 10 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो.