मी अखेरच्या श्वासापर्यंत भारतीयच - सानिया मिर्झा
By Admin | Updated: July 24, 2014 14:00 IST2014-07-24T13:58:13+5:302014-07-24T14:00:29+5:30
माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी भारतीयच राहणार असून मला 'परकीय' दाखवण्याच्या प्रयत्नांना माझा विरोध आहे असे जोरदार प्रत्युत्तर टेनिसपटू सानिया मिर्झाने दिले आहे.

मी अखेरच्या श्वासापर्यंत भारतीयच - सानिया मिर्झा
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २४ - माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी भारतीयच राहणार असून मला 'परकीय' दाखवण्याच्या प्रयत्नांना माझा विरोध आहे असे जोरदार प्रत्युत्तर टेनिसपटू सानिया मिर्झाने दिले आहे. तेलंगणच्या ब्रँड अँम्बेसेडरपदावर सानिया मिर्झाच्या नियुक्तीविषयी निर्माण झालेल्या वादावर भाष्य करत सानियाने टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
सानिया मिर्झा पाकिस्तानची सून असून तिला तेलंगणचे ब्रँड अँम्बेसेडरपद द्यायला नको असे विधान तेलंगणमधील भाजप नेते के. लक्ष्मण यांनी केले होते. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या विधानाशी सहमती दर्शवली होती. भाजपच्या या विधानावर वाद निर्माण झाला आहे. या वादावर सानिया मिर्झाने गुरुवारी प्रसिद्धीपत्रक काढून टीकाकारांना उत्तर दिले आहे. यात सानिया म्हणते, मी जन्मापासून भारतीयच असून माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी भारतीयच राहणार आहे. मला परकीय दाखवण्याच्या प्रयत्नांना माझा कायम विरोध राहणार आहे. देशातील राजकीय नेत्यांनी या वादावर ऐवढा वेळ खर्च करावा ही बाब दुर्दैवी आहे असा सणसणीत टोलाही तिने लगावला आहे. या वादामुळे मला दुःख झाले असेही तिने पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, भाजप नेते व केंद्रीय पर्यावरण आणि सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सानिया मिर्झा ही केवळ तेलंगणच नव्हे तर भारताची ब्रँड अँम्बेसेडर आहे. सानिया देशाची शान असल्याची स्तुतिसुमनेही त्यांनी उधळली आहेत.