गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण जबरदस्त तापले आहे. आधी तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेवरून राजकारण तापले होते आणि आता महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषेच्या मुद्यावरून राजकारण सुरू आहे. यातच आता, 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील नायक एक्स मार्कोस (मरीन कमांडो फोर्स) प्रवीण कुमार तेवतिया यांनी या वादावर भाष्य करत, थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच काही प्रश्न विचारले आहेत.
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज हॉटेलमध्येही दहशतवादी शिरले होते. तेव्हा तेथून अनेकांना वाचवणाऱ्या कमांडोने राज ठाकरे यांना सवाल केला आहे की, मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी तुमचे योद्धे कुठे होते? या कमांडोने सोशल मीडियावर एक फोटोही पोस्ट केला आहे. यात संबंधित कमांडो गणवेशात दिसत आहे. त्याच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर UP असे लिहिलेले आहे आणि गळ्यात बंदूक दिसत आहे.
काय म्हणाले तेवतिया? -तेवतिया यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, "मी 26/11 ला मुंबई वाचवली होती. मी उत्तर प्रदेशा आहे आणि महाराष्ट्रासाठी रक्त सांडतो. मी ताज हॉटेल वाचवले. राज ठाकरेंचे तथाकथित योद्धे कुठे होते? देशात फूट पाडू नका. हास्याला कुठल्याही भाषेची आवश्यकता नसते." तेवतिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषावादासंदर्भातील एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देते ही पोस्ट केली आहे.
कोण आहेत प्रवीण कुमार तेवतिया? -प्रवीण कुमार तेवतिया हे माजी कमांडो (MARCOS) आहेत. त्यांनी मुंबईतील ताज हॉटेलवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान, दहशतवादविरोधी कारवाईत आपल्या पथकाचे नेतृत्व केले होते. या कारवाईदरम्यान त्यांना अनेक जखमा झाल्या होत्या. त्यांना चार गोळ्याही लागल्या होत्या. मात्र, तरीही ते शौर्याने लढत राहिले. त्यांच्या जलद कारवाईने आणि प्रतिहल्ल्याने, त्या दिवशी १५० हून अधिक लोकांचा जीव वाचला.