Hyderabad Encounter: Four suspects killed in Hyderabad rape case | Hyderabad Encounter: हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही संशयीत चकमकीत ठार
Hyderabad Encounter: हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही संशयीत चकमकीत ठार

हैदराबाद : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी शुक्रवारी पहाटे पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. चौघा संशयीतांना ठार केल्यामुळे देशातील अनेकांनी आनंद व्यक्त केला असून, हैदराबादमध्ये अनेकांनी मिठाई वाटली, पोलीस अधिकाऱ्यांवर फुले उधळली आणि अनेक महिलांनी पोलिसांना राख्याही बांधल्या. बलात्कारपीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आम्हाला न्याय मिळाला, अशीच भावना व्यक्त केली आहे.
पशुवैद्यकीय तरुणीवर २८ नोव्हेंबर रोजी या चार आरोपींनी सामुहिक बलात्कार केल्यानंतर त्या भयानक छळाने ती मरण पावली. पुरावा नष्ट करण्यासाठी या नराधमांनी तिचा मृतदेह जाळून टाकला होता. या घटनेमुळे देशभर संताप व्यक्त करण्यात आला आणि संसदेमध्येही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.
देशात ठिकठिकाणी हैदराबादच्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी मोर्चे निघाले होते. बलात्काºयांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी कायद्यात दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयाकडे सोपविण्याचे जाहीर केले होते.
हैदराबादमधील या धक्कादायक प्रकारने दिल्लीमध्ये १६ डिसेंबर २०१२ साली निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्काराची व तिच्या हत्येच्या घटनेची आठवण सर्वांच्या मनात जागी झाली. हैदराबादमधील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. ते न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांना तपासाचा भाग म्हणून घटनास्थळी नेण्यात आले होते.
चौघांना ठार माल्याबद्दल अनेक खासदारांनी आनंद व्यक्त केला आहे, तर मेनका गांधी यांनी पोलिसांनी आरोप सिद्ध न झालेल्या संशयीतांना याप्रकारे ठार मारणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले आहे. भाजपच्या अनेक खासदारांनी मात्र चौघांना ठार मारण्याचे समर्थन केले आहे. उन्नाव बलात्कारपीडितेला जाळण्याचा प्रकार गुरुवारी घडल्याच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद प्रकरणातील संशयीतांना चकमकींमध्ये पोलिसांनी ठार मारले, हे चांगलेच केले, असे मत देशभरात व्यक्त होत आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पालकांनीही चौघांना ठार मारल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. निर्भयाच्या बलात्काºयांना न्यायालयाने फाशी ठोठावूनही त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे ते संतप्त आहेत.


- पशुवैद्यक तरुणीवर काही दिवसांपूर्वी सामूहिक बलात्कार करणारे चारही आरोपी शुक्रवारी पहाटे चकमकीत ठार झाल्याची माहिती पोलिसांनीच दिली. तरुणीवर बलात्कार करून, जिथे जाळण्यात आले, त्याचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी चौघा संशयीतांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी नेते होते.
- तिथे पोहोचल्यानंतर त्या चौघांनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे हिसकावली आणि पोलिसांवर गोळीबार केला.चौघांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यांना शरण येण्याचे आवाहनही चौघांनी धुडकावून लावले. त्यामुळे गोळ्या झाडणाºया या संशयीतांवर आम्ही स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात चौघे ठार झाले, असे पोलीस आयुक्त व्ही सी. सज्जनार यांनी सांगितले.
- मोहम्मद अली उर्फ मोहम्मद अरिफ, जोलू शिवा, जोलू नवीनकुमार, चिंताकुंता चेन्नाकेशवुलू अशी चौघांची नावे असून ते ट्रक व्यवसायामध्ये काम करत होते. चौघेही २० ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. त्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

चौघांच्या कुटुंबीयांना धक्का
येथील पशुवैद्यक तरुणीच्या बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या चौघे जण पोलीस चकमकीत मारले गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद आरिफच्या आईला बोलताच येत नव्हते. मात्र आपल्या मुलाने हा गुन्हा केला असेल, तर त्याला सर्वात कडक शिक्षा देण्यात यावी, असे त्याच्या वडिलांनी आधीच म्हटले होते.
चेन्नाकेशवुलूची पत्नी तर सतत रडत होती. ती म्हणाली की मी आता एकटी राहिली आहे. तिचा चेन्नाकेशवुलूशी अलीकडेच विवाह झाला होता. त्याला मूत्रपिंडाचा आजार होता. माझ्या नवºयाला काही होणार नाही आणि तो लवकरच घरी परतेल, असे मला सांगण्यात आले होते, पण आता काय करावे, मला सुचत नाही, असे तिने बोलून दाखविले. सिवा नावाच्या आरोपीची आई जोल्लू रामप्पा म्हणाली की माझ्या मुलाने तो गुन्हा केलाही असेल. पण त्यासाठी दिलेली शिक्षा खूपच भयंकर आहे.
हे चारही संशयीत अतिशय गरीब कुटुंबातील होते. पण त्यांनी नंतर कष्टाने बºयापैकी पैसा मिळविला. मात्र दारू आणि इतर व्यसनांनी त्या चौघांचा नाश केला.

हा अधिकार कोणी दिला?
बलात्कारासारखे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करणाºया नराधमांना योग्य शिक्षा झाली अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असल्या तरी संशयीतांना ठार मारण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असे सवालही अनेकांनी उपस्थित केले आहेत. शिक्षा सुनावणे हे न्यायालयाचे काम आहे. पोलिसांनी अशा चकमकीत आरोपींना ठार मारणे योग्य नव्हे असे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

घटनाक्रम
1)सारा प्रकार जाणून घेण्यासाठी पोलिसांनी चारही संशयीतांना पहाटेच हैदराबादमधील घटनास्थळी बसने नेले
2)बसने उतरल्यानंतर प्रत्यक्ष ठिकाण दाखवण्यास चौघांना सांगितले
3)तिथे पोहाचताच चौघांनीही पोलिसांचर हल्ला केला
4)त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, ज्यात चौघेही ठार झाले.

Web Title: Hyderabad Encounter: Four suspects killed in Hyderabad rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.