पार्ट टाईम कारवाया, फुल टाईम दहशत; 'हायब्रीड' दहशतवाद्यांमुळे वाढलं सुरक्षा दलांचं टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 21:26 IST2021-07-04T21:24:56+5:302021-07-04T21:26:33+5:30
श्रीनगर शहर आणि काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांसमोर नवं आव्हान

पार्ट टाईम कारवाया, फुल टाईम दहशत; 'हायब्रीड' दहशतवाद्यांमुळे वाढलं सुरक्षा दलांचं टेन्शन
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये आता सुरक्षा दलांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. हायब्रीड दहशतवाद्यांच्या रुपात सुरक्षा दलांचे जवान श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात अडचणींचा सामना करत आहेत. दहशतवादी कारवाया घडवल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगणारे दहशतवादी सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. कट्टर दहशतवाद्यांची बरीचशी माहिती सुरक्षा दलांकडे उपलब्ध आहे. पण सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगणाऱ्या हायब्रीड दहशतवाद्यांची फारशी नोंद सुरक्षा दलांकडे नाही. त्यामुळे या दहशतवाद्यांचा सामना करण्याचं आव्हान आता सुरक्षा दलांसमोर आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून श्रीनगरसह खोऱ्यांमधील सोप्या लक्ष्यांवरील हल्ले वाढले आहेत. बहुतांश घटनांमध्ये पिस्तुलधारी तरुणांचा हात असल्याचं उघड झालं आहे. सुरक्षा दलांच्या यादीत या दहशतवाद्यांची नावं नाहीत. हायब्रीड दहशतवादी पार्ट टाईम कारवाया करत असल्यानं त्यांच्यावर लक्ष ठेवणं अवघड असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हायब्रीड दहशतवादी पूर्ण वेळ कारवाया करत नाहीत. या दहशतवाद्यांना मोहीमा दिल्या जातात. त्यांच्याकडे काही कारवायांची जबाबदारी असते. वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर हायब्रीड दहशतवादी कामाला लागतात. मोहीम पूर्ण झाल्यावर ते त्यांच्या नियमित दिनचर्येकडे वळतात. सर्वसामान्य आयुष्य जगतात. पुढील आदेश येईपर्यंत हायब्रीड दहशतवादी कोणतीही कारवाई करत नाहीत. ते सामान्य नागरिकाप्रमाणे वावरतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवणं अवघड जातं अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.