पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 09:03 IST2025-09-13T09:03:12+5:302025-09-13T09:03:57+5:30
उपराष्ट्रपतींचे बंधू सी. पी. कुमारेश यांनी सांगितले की, सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो.

पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
तिरुपूर/नवी दिल्ली : देशाचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून मी माझ्या मुलाचे नाव ठेवले, असे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या आई जानकी अम्माल यांनी शुक्रवारी सांगितले.
त्यांनी सांगितले की, आपल्या मुलाचे राधाकृष्णन हे नाव तू ठेवत आहेस. हा भविष्यात उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती होईल असे तुला वाटतेय का, असा प्रश्न माझ्या पतिराजांनी मला विचारला होता. त्या पेशाने शिक्षिका होत्या. त्या म्हणाल्या, सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले. माझ्या पतिराजांनी केलेले भाकीत खरे ठरले.
आम्हाला अत्यंत अभिमान
उपराष्ट्रपतींचे बंधू सी. पी. कुमारेश यांनी सांगितले की, सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. राज्यसभेच्या सभापतिपदाचीही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि ते ती यशस्वीरीत्या पार पाडतील.
लोकशाही होणार मजबूत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे व्यापक ज्ञान व अनुभव यामुळे लोकशाही प्रक्रिया अधिक मजबूत होणार आहे.
राधाकृष्णन यांचा कार्यकाळ ११ सप्टेंबर २०३० पर्यंत
संविधानानुसार मृत्यू किंवा राजीनामा या कारणांमुळे उपराष्ट्रपतिपद रिक्त झाल्यास त्या पदासाठीच्या निवडणुकीत जो उमेदवार विजयी होतो त्याला पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळतो.
त्या अनुषंगाने नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा कार्यकाळ ११ सप्टेंबर २०३० पर्यंत असेल. ते या पदावर विराजमान होणारे तामिळनाडूमधील तिसरे नेते आहेत. त्यांची मित्रमंडळी त्यांचा उल्लेख ‘पच्चई तमिझन’ (खरा-खुरा तामिळ) असा करतात.
कोण होते उपस्थित?
सी. पी. राधाकृष्णन यांनी इंग्रजीत शपथ घेतली. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राज्यसभा उपसभापती हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.