पतीने विनाकारण पत्नीवर संशय घेणे हा गंभीर मानसिक अत्याचार; महिलेचा घटस्फोट मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 11:49 IST2025-11-01T11:49:34+5:302025-11-01T11:49:34+5:30
विवाह हा विश्वास, सन्मान आणि भावनिक सुरक्षितता या गोष्टींमुळे टिकतो.

पतीने विनाकारण पत्नीवर संशय घेणे हा गंभीर मानसिक अत्याचार; महिलेचा घटस्फोट मंजूर
कोची: पतीने विनाकारण पत्नीच्या चारित्र्यासंदर्भात संशय बाळगणे हा गंभीर स्वरूपाचा मानसिक अत्याचारच आहे. अशा वर्तनाने वैवाहिक जीवन नरकासमान होते, असे केरळ उच्च न्यायालयाचे न्या. देवन रामचंद्रन आणि न्या. एम. बी. स्नेहलता यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
महिलेच्या घटस्फोट याचिकेवर केरळ उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, वैवाहिक जीवन हे परस्पर विश्वास, प्रेम, सन्मान यांच्यामुळे उत्तम होते. मात्र, परस्परांवरील विश्वासाऐवजी ती जागा संशयाने घेतली की, पती-पत्नीचे नाते अर्थहीन होते. व्ही. भगत विरुद्ध डी. भगत या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा दाखला देत केरळ उच्च न्यायालयाने महिलेचा घटस्फोट अर्ज मंजूर केला. न्यायालयाने सांगितले की, जिथे संशय घेतला जातो, असे नाते जपणे हे स्त्रीच्या सन्मान व मानसिक आरोग्य या दोन्हींच्या दृष्टीने घातक आहे.
तिलाही स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे
या महिलेने घटस्फोटासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती. केरळ उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द केला. या प्रकरणावर केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, पतीने पत्नीवर वारंवार संशय घेणे, त्यादृष्टीने तिला प्रश्न विचारणे यामुळे तिची मानसिक शांतता नाहीशी होते. तिचे आयुष्य भीती, तणावाने घेरले जाते. अशा स्थितीत पत्नीने आपले वैवाहिक नाते टिकवावे, अशी अपेक्षा चुकीची आहे. तिलाही स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे.
विश्वास संपला की विवाह बनतो एक ओझे
कोर्टाने म्हटले की, विवाह हा विश्वास, सन्मान आणि भावनिक सुरक्षितता या गोष्टींमुळे टिकतो. हे संपले की विवाह फक्त एक ओझे बनते.. या जोडप्याचा विवाह २०१३ साली झाला होता. विवाहानंतर पत्नी नर्स म्हणून काम करत होती, तर पती परदेशात नोकरी करत होता. पतीने तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले आणि वचन दिले की परदेशात नोकरीची सोय करेल. पतीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून तिने आपली नोकरी सोडली आणि त्याच्यासोबत परदेशात गेली होती.