मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाने डोळे उघडले तेव्हा त्याला धक्का बसला. २२ दिवसांपासून बेपत्ता असलेली पत्नी शेजारी असलेल्या बेडवर दिसली. हे पाहून नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण महिला आपल्या पतीला ओळखू शकली नाही. कारण डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिची स्मरणशक्ती गेली होती. आता पती रुग्णालयात पत्नीची काळजी घेत असल्याने महिलेला हळहळू सर्व आठवत आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे ही घटना घडली. शहरातील केवटा तलाव येथील रहिवासी राकेश कुमार याची पत्नी शांती देवी १३ जानेवारी रोजी अचानक घरातून बेपत्ता झाली होती. उन्नावपासून कानपूर, लखनऊ आणि कन्नौजपर्यंत शोध घेतला. पण ती सापडली नाही. निराश होऊन पतीने १६ जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
राकेश वेल्डिंगचे काम करतो. त्याच्या घरी त्याची पत्नी शांती व्यतिरिक्त दुसरं कोणीही नाही. त्याला त्याची पत्नी सापडली नाही, म्हणून तो कामावर किंवा घरी गेला नाही. तो त्याच्या मित्राच्या घरी राहू लागला. याच दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी राकेशला डोळ्यांमध्ये समस्या येऊ लागल्याने तो तपासणीसाठी रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
७ फेब्रुवारी रोजी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर राकेशला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. राकेशने डोळे उघडले तेव्हा त्याच्या शेजारी असलेल्या बेडवर दाखल असलेल्या एका महिला रुग्णाने पाणी मागितलं. त्या महिलेचा आवाज ऐकून राकेशला धक्काच बसला. जेव्हा त्याने जवळ जाऊन पाहिलं तेव्हा ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याची हरवलेली पत्नी असल्याचं आढळलं. हे पाहून पती राकेश भावुक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण डोक्याला दुखापत असल्याने पत्नीला काहीही सांगता आलं नाही आणि ती पतीला ओळखू शकली नाही.
जिल्हा रुग्णालयात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर, राकेशने त्याचं सर्व दुःख विसरून पत्नीची सेवा करण्यास सुरुवात केली जेणेकरून त्याची पत्नी लवकर बरी होईल. राकेशने सांगितलं की, १३ जानेवारी रोजी त्याची पत्नी घरातून कुठेतरी गेली होती. खूप शोध घेऊनही ती सापडली नाही तेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.