बाबो! 2 बायकांनी वाटून घेतला पती; 3-3 दिवस दोघींसोबत राहणार, 1 दिवस स्वत:च्या मर्जीने जगणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 15:40 IST2023-01-21T15:33:08+5:302023-01-21T15:40:23+5:30
दोन पत्नींनी आपल्या पतीसोबत राहण्यासाठी आठवड्यातून प्रत्येकी तीन-तीन दिवस विभागले आहेत.

बाबो! 2 बायकांनी वाटून घेतला पती; 3-3 दिवस दोघींसोबत राहणार, 1 दिवस स्वत:च्या मर्जीने जगणार
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. एका पुरुषाच्या दोन पत्नींनी आपल्या पतीसोबत राहण्यासाठी आठवड्यातून प्रत्येकी तीन-तीन दिवस विभागले आहेत. जेव्हा कुटुंबात वाद खूप वाढला तेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एका पत्नीने पोलिसात तक्रार केली. यानंतर हे प्रकरण समुपदेशनासाठी पुढे पाठवण्यात आले. तिथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत करार निश्चित करण्यात आला असून, त्यावर तिघांचेही एकमत झाले आहे.
करारानुसार दोन्ही पत्नी त्यांच्या सासरच्या घरी राहतील आणि पती प्रत्येकी तीन-तीन दिवस त्यांच्यासोबत राहिल. सोमवार ते बुधवार पती पहिल्या पत्नीसोबत राहणार आहे. तर गुरुवार ते शनिवार तो दुसऱ्या पत्नीसोबत राहणार आहे. आठवड्यातून एक दिवस, रविवारी, पती त्याच्या पसंतीच्या कोणत्याही पत्नीसोबत राहू शकतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुरादाबाद शहरात राहणाऱ्या एका महिलेने एसएसपी ऑफिसमध्ये तक्रार दाखल केली होती की, 2017 मध्ये लग्न झाल्यानंतर पतीने तिला तिच्या सासरच्या घरी नेले नाही आणि शहरात भाड्याच्या घरात राहायला दिले. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने सासरच्या घरी जाण्याचा हट्ट केला असता पतीने तिला घेऊन जाण्यास नकार दिला आणि काही दिवसांनी नवरा अचानक गायब झाला.
पतीचा शोध घेत असताना ती महिला तिच्या सासरच्या घरी पोहोचली जिथे तिला समजले की पती आधीच विवाहित आहे आणि त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत. यानंतर महिलेने एसएसपी कार्यालयात हजर राहून तक्रार केली.त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांनाही समुपदेशनासाठी पाठवले. दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"