आंध्र प्रदेशावर धडकणार चक्रीवादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 02:37 AM2018-12-14T02:37:50+5:302018-12-14T02:38:06+5:30

२४ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार

Hurricane in Andhra Pradesh to hit | आंध्र प्रदेशावर धडकणार चक्रीवादळ

आंध्र प्रदेशावर धडकणार चक्रीवादळ

Next

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर येत्या २४ तासांत चक्रीवादळात होणार असून, ते पुढील ७२ तासांत आंध्र प्रदेशाच्या दिशेने येऊ लागले आहे़ यामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील काही दिवसांत तेथील तापमानातही वाढ होणार आहे़ येत्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे १०़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

विदर्भातील अहेरी २१, कोंडागाव १०, सिरोंचा १८ मिमी पावसाची नोंद झाली होती. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता तीव्र झाला असून, त्यांचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे़ गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता हा कमी दाबाचा पट्टा श्रीलंकेतील त्रिकोमालीपासून ८३० किमी, तर चेन्नईपासून ११५० किमी आणि आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणमपासून १३३० किमी अंतरावर होता.

शुक्रवारी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असून, त्यानंतर ते आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे़ या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर १५ डिसेंबरपासून जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच १६ डिसेंबरला अनेक ठिकाणी अतिवृष्टी (२०० मिमीपेक्षा अधिक) होण्याची शक्यता आहे़ मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ १६ डिसेंबरला हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी असण्याची शक्यता आहे़

तीन राज्यांवर परिणाम
या चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, उत्तर तामिळनाडू, पाँडेचरी येथे होणार आहे़
विदर्भात १५ ते १७ डिसेंबर दरम्यान बहुतेक ठिकाणी आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़
या चक्रीवादळामुळे मराठवाड्यातील अनेक ठिकाणी आकाश ढगाळ राहणार असून, तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे़

Web Title: Hurricane in Andhra Pradesh to hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.