Bihar Congress: बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पाटणा दौऱ्यावर होते. मात्र यावेळी राहुल गांधींच्या कार्यक्रमात मोठा गदारोळ झाला. पाटणा येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात पक्षाच्या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. माजी अध्यक्ष आणि माजी आमदाराच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याचा घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता बिहार निवडणुकीआधीच काँग्रेस कार्यकर्त्यांमधील धुसफूस समोर आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी बिहार दौऱ्यावर असताना पाटणा येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात पक्षाच्या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. माध्यमांच्या वृ्त्तानुसार, माजी प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांच्या समर्थकाला इतर काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करून मारहाण केली. माजी आमदार अमितकुमार टुन्ना यांच्या समर्थकांवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
राहुल गांधी सोमवारी कन्हैया कुमारच्या रोको निर्गमन, नौकरी दो यात्रेत बेगुसरायमध्ये सहभागी झाल्यानंतर ते दुपारी पटनाला पोहोचले. श्रीकृष्ण मेमोरिअल हॉलमध्ये त्यांनी काँग्रेसच्या संविधान सुरक्षा परिषदेला संबोधित केले. यानंतर ते सदकत आश्रम येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात पोहोचले. पक्ष कार्यालयात यावेळी राहुल गांधी यांनी बिहारमधील काँग्रेस नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सदकत आश्रमात राहुल यांची सभा सुरू असताना पक्षातील दोन गटांमध्ये हाणामारी झाली.
यावेळी बिहार काँग्रेसचे माजी अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांच्या समर्थकाने पक्षाचे माजी आमदार अमित कुमार टुन्ना यांच्याशी गैरवर्तन केले. यानंतर टुन्ना यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी धावत जाऊन अखिलेश सिंह यांच्या समर्थकाला मारहाण केली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले पक्षाचे नेते व इतर कार्यकर्तेही चक्रावले. या घटनेनंतर बिहार काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी पाहायला मिळाली. बैठक आटोपल्यानंतर राहुल गांधी थेट पाटणा विमानतळावर पोहोचले आणि दिल्लीला रवाना झाले.