पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी राबवलेलं ऑपरेशन सिंदूर आणि अखेरीस अचानक झालेला युद्धविराम या मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. आता राहुल गांधींकडून होत असलेल्या या टीकेला भाजपाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांना अजून देश कळला नाही, त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार, असा टोला बावनकुळे यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांना काही कळत नाही. ते कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करत नाहीत. राहुल गांधी हे शिकून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. जर आपल्याला काही कळत नसेल तर ते शिकून घेतलं पाहिजे. राहुल गांधी यांना नेमकं काय झालंय, हे कळत नाही आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींकडून गेल्या काही दिवसांपासून देशाच्या परराष्ट्र धोरणांवर सातत्याने करण्यात येत असलेल्या विधानांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी यांना अजून देश कळलेला नाही. त्यांना परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्र मंत्रालय काय समजणार? असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांना परराष्ट्र मंत्री आमि सरकार अपयशी ठरलंय, असं वाटत असेल तर त्यांनी वर्षातून दोन दोन महिने परदेशात जाऊन राहिलं पाहिजे. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परराष्ट्र धोरण शिकवत आहेत, उलट राहुल गांधी यांनीच दहशतवादाविरोधातील लढाई कशी लढली जाते आणि आमचे जवान कसे लढतात हे शिकून घेतलं पाहिजे, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला.