Gambhira Bridge Collapse in Gujarat :गुजरातमधून मोठी बातमी समोर येत आहे. आणंद आणि बडोद्याला जोडणारा गंभीरा पूल बुधवारी सकाळी कोसळला आहे. यामुळे अनेक वाहने नदीच्या पाण्यात पडली आहेत. तर टँकर त्या कोसळलेल्या पुलावर अडकला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून इतरांचा शोध सुरु करण्यात आला आहे.
काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या अपघाताचा व्हिडीओ पोस्ट करून माहिती दिली होती. आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडणारा मुख्य गंभीरा पूल कोसळला आहे. अनेक वाहने नदीत पडल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करावे आणि वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे त्यांनी म्हटले होते.
पाच ते सहा प्रवासी वाहने तसेच मालवाहू ट्रक पुलाखाली कोसळल्याची माहिती मिळत आहे. पोलिस आणि पाणबुड्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली आहे. नदीत पडलेल्या वाहन चालकांसह प्रवाशांचा शोध सुरु आहे. हा पूल ४५ वर्षे जुना आहे. जो मध्य गुजरातला सौराष्ट्राशी जोडतो. नदीमध्ये सध्यातरी दोन ट्रक, एक बोलेरो अशी चार वाहने दिसत आहेत.