उत्तराखंडच्या डोंगराळ भागात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. मंगळवारी पहाटे अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैंण-विनायक मार्गावर एक भीषण रस्ते अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली एक बस अनियंत्रित होऊन थेट खोल दरीत कोसळली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचा चक्काचूर झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पहाटेची वेळ अन् काळाचा घाला
ही बस भिकियासैंणहून रामनगरच्या दिशेने जात होती. सकाळी ६ च्या सुमारास ही बस द्वाराहाट येथून निघाली. शिलापनीजवळ पोहचताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळली. थंडीच्या कडाक्यात आणि पहाटेच्या शांततेत बस कोसळल्याचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. बसमध्ये एकूण १२ प्रवासी सवार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी रक्ताचा सडा, बचावकार्यात अडचणी
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि एसडीआरएफची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दरी अत्यंत खोल असल्याने जखमींना बाहेर काढताना बचाव पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. जखमींना तातडीने उपचारासाठी भिकियासैंण येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्यात येण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून तातडीने मदत
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल यांनी सांगितले की, बचावकार्य वेगाने सुरू आहे. जिल्हा मुख्यालयापासून हे घटनास्थळ सुमारे १०० किलोमीटर लांब आहे, तरीही प्रशासकीय चमू घटनास्थळी पोहचली आहे. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मृतांच्या नातेवाईकांवर शोककळा
या अपघातात प्राण गमावलेल्यांची अद्याप अधिकृत ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मात्र, सुखाचा प्रवास सुरू असताना अचानक झालेल्या या काळाच्या घालामुळे पीडित कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डोंगराळ भागातील अरुंद रस्ते आणि वेगावरील मर्यादा न पाळणे हे या अपघाताचे कारण असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
Web Summary : A bus accident in Uttarakhand's Almora district resulted in six fatalities and multiple injuries. The bus, carrying twelve passengers, fell into a deep gorge after the driver lost control. Rescue operations are underway, and the injured are receiving treatment.
Web Summary : उत्तराखंड के अल्मोड़ा जिले में एक बस दुर्घटना में छह लोगों की मौत हो गई और कई घायल हो गए। बारह यात्रियों को ले जा रही बस चालक के नियंत्रण खो देने के बाद एक गहरी खाई में गिर गई। बचाव कार्य जारी है और घायलों का इलाज चल रहा है।